राज्यातील महिला व मुलींचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करण्यासाठी राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना एक जुलै, २०२४ पासून लागू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रतिमहिना १५०० रुपये देण्यात येणार आहेत. या योजनेची प्रभावी व सुलभ अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने या योजनेची व्याप्ती वाढविण्याकरिता दि. १२ जुलै रोजी शासन निर्णय जारी करून काही सुधारणा केल्या आहेत. या निर्णयाचा आता हजारो महिलांना फायदा होणार आहे.
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीणफ योजनेच्या प्रभावी अमलबजावणीसाठी नवीन शासन निर्णय जारी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणात अर्ज करत आहेत. पण हा अर्ज करताना महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागतेय. याच अडचणी कमी व्हाव्यात यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. १३ जुलै रोजी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. माझी लाडकी बहीण योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे कुटुंबाची व्याख्या पती, पत्नी आणि त्यांची अविवाहित मुले अशी केली आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
लाभार्थीची नोंद झाल्यावर ५० रुपये प्रोत्साहन भत्ता!
या नविन आदेशात पात्र महिलेचे अर्ज भरण्यासाठी नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका/अंगणवाडी सेविका, एनयूएलएम यांचे समूह संघटक (सीआरपी), मदत कक्ष प्रमुख, सिटी मिशन मॅनेजर, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरुन घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे. तसेच नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका/अंगणवाडी सेविका, एनयूएलएम यांचे समूह संघटक (सीआरपी), मदत कक्ष प्रमुख, सिटी मिशन मॅनेजर, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिला लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिध्द झाल्यावर, एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन ऍप/पोर्टलवर प्रति यशस्वी पात्र लाभार्थीची नोंद झाल्यावर ५० रुपये याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.
योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या-
कुटुंब याचा अर्थ पती, पत्नी व त्यांची अविवाहित मुले/मुली. नवविवाहित महिलेच्या बाबतीत तीचे नाव रेशनकार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही. त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणार्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे (१) जन्म दाखला किंवा (२) शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा (३) अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते. याशिवाय महिलेच्या पतीचे १५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड व १५ वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात यावे.
पोस्टातील बँक खात आता ग्राह्य
अर्ज करणार्या महिलेचे बँकेत खाते असणे आवश्यक करण्यात आले आहे. आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खातेही ग्राह्य धरण्यात येणार आहे.
लाईव्ह फोटोसंदर्भात मोठा बदल
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना वेगवेगळ्या पद्धतीने फॉर्म भरण्याची सोय करून देण्यात आली आहे. महिला नारीशक्ती, पोर्टल या वेगवेगळ्या माध्यमातून हा अर्ज करू शकतात. याआधी महिलांना अर्ज करताना आपला लाईव्ह फोटो द्यावा लागायचा. पण आता नव्या निर्णयाअंतर्गत तशी गरज भासणार नाही. कारण आता योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल.
पीएफएमएस-डीबीटी प्रणाली
केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ पीएफएमएस-डीबीटी प्रणालीव्दारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे. केंद्र/राज्य शासनाच्या विविध योजनांमधील (उदा.पीएम किसान, पोषण, मनरेगा, पीएम स्वनिधी, जेएसवाय, पीएमएमव्हीवाय व अन्य तत्सम योजना) जे लाभार्थी मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरत असतील, त्यांचा डाटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे केवायसी व आधार संलग्न यापूर्वीच झालेले असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरुन घेवून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ देण्यात यावा. मात्र, हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरुन घेण्यात यावा. असेही आदेशित करण्यात आले आहे.
ग्रामस्तरीय समितीची स्थापना-
गावपातळीवर ग्रामसेवक, कृषि सहायक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी. सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील. समितीने सदर योजनेसाठी गावपातळीवर शिबिर आयोजित करुन त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पध्दतीने लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात यावी. ऑफलाईन अर्ज यथावकाश ऍप/पोर्टलवर भरण्यात यावेत. ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात येईल.
पात्र-अपात्र यादीवर हरकती
तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिध्द करण्यात यावी. सदर प्रसिध्द करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्यांचे निराकरण करण्यात यावे. तसेच व्दिरुक्ती टाळण्यात यावी.
३१ ऑगस्टपर्यंत मुदत
महिलांना ३१ ऑगस्टपर्यंत या योजनेसाठी अर्ज करता येणार आहेत. जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य सरकारतर्फे करण्यात आले आहे.
लाडकी बहीण योजनेचे पैसे १५ ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा -
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत सुरुवातीला १५ जुलै होती. मात्र, अंगणवाडी, ग्रामपंचायती, सेतू केंद्र आणि सरकारी कार्यालयांमध्ये महिलांची प्रचंड गर्दी होत असल्याचे पाहून राज्य सरकारने या योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली होती. आतापर्यंत ज्या महिलांचे अर्ज भरून झाले आहेत, त्यावरुन १६ जुलैला तात्पुरत्या पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल. तर १ ऑगस्टला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे १४ ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरु होईल. साधारण १५ ऑगस्टपर्यंत राज्यातील सर्व महिलांना ही रक्कम मिळेल. ऑगस्ट महिन्यानंतर पुढे दर महिन्याच्या १५ तारखेला महिलांच्या बँक खात्यात १५०० रुपयांची रक्कम जमा होईल.
बदलले पाच नियम थोडक्यात-
- १) रेशन कार्डसंदर्भात- नवविवाहित महिलेचे नाव लगेच रेशन कार्डवर लावणे शक्य होत नाही. त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशनकार्ड हे अत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे.
- २) महिलेचा परराज्यात जन्म- परराज्यात जन्म झालेल्या व संबंधित महिला सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल तसेच या महिलने महाराष्ट्रातील अधिवास असलेल्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर तर अशा बाबतीत महिलेच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते. याशिवाय महिलेच्या पतीचे १५ वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड व १५ वर्षांपूर्वीचे मतदानकार्ड ग्राह्य धरण्यात येणार आहे.
- ३) पोस्टातील बँक खाते- अगोदर तइर बँकेचे खाते ग्राह्य झरले जात होते, मात्र आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता पोस्टातील बँक खातेदेखील ग्राह्य धरले जाणार आहे.
- ४) फोटोचा फोटा- तसेच योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. म्हणजेच फोटो अपलोड करण्यासाठी आता लाभार्थ्याला प्रत्यक्षात हजर राहण्याची आवश्यकता नाही.
- ५) अर्ज भरण्याचे अनेक मार्ग - आता सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भआगातील बालवाडी सेविका, अंगवणवाडी सेविका, आशा सेविका, सेतु सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र यांना महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे. म्हणजेच वर नमूद केलेल्या व्यक्ती, आस्थापना महिलांचे अर्ज भरून घेऊ शकतात.
निवडणुकीनंतरही योजना सुरू-
मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजना राज्यात लागू केली आहे. या योजनेत पात्र महिलांना महिन्याला १५०० रुपये, तर वर्षाला १८००० रुपये दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. ही योजना फक्त आगामी निवडणुकीपुरती राबवण्यात येत आहे, असा दावा विरोधकांकडून केला जात होता. पण ही योजना आगामी काळातही चालूच राहील. ती निवडणुकीनंतर बंद केली जाणार नाही, असे स्पष्टीकरण राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात दिले होते.
राज्य शासनाने या योजनेची व्याप्ती वाढविल्यामुळे अंमलबजावणी अत्यंत सुलभ होणार असून अर्ज दाखल करणे सोपे होणार असल्याने अधिकाधिक लाभार्थी महिला आता या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत.