Resist office teasing- |
तुम्ही ऑफिसच्या छेडछाडीचे, चेष्टा-मस्करीचे बळी आहात का? तुमच्या सहकर्मचाऱ्यांच्या विनोदांमुळे किंवा अती खेळकर घटनांमुळे तुम्हाला अपमानित, किंवा अस्वस्थ वाटते का? तर असा प्रकार तुमच्याच बाबतीत घडत आहे, असे नाही. खरेतर कार्यालयीन छेडछाड हा गुंडगिरीचा एक कपटी प्रकार असू शकतो ज्यामुळे तुमचा स्वाभिमान, काम करण्याची उत्पादकता (प्रोफेशलनेस) आणि एकूणच तुमचे आरोग्य, काम करण्याची प्रवृत्ती प्रभावित होऊ शकते. तुम्ही या परिस्थितीचा सामना करण्यासाठी, एकूणच असे प्रकार थांबविण्यासाठी जरूर प्रयत्न करायला हवे. कारण, तुम्हाला आदरयुक्त आणि सर्वसमावेशक वातावरणात काम करण्याचा अधिकार आहे. या लेखात, कार्यालयातील छेडछाडीच्या विरोधात उभे राहण्यासाठी आपण कोणत्या कृती करू शकतो यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. ऑफिसच्या छेडछाडीच्या वेळी स्वत:ची काळजी घेण्याचे आणि तुमच्या कल्याणाला प्राधान्य देण्याचे महत्त्वही या लेखात स्पष्ट केले आहे. बोलून आणि कृती करून, किंवा इतर उपायांनी तुम्ही स्वतःसाठी आणि तुमच्या सहकाऱ्यांसाठी अधिक सुसंवादी आणि उत्पादक वातावरण तयार करू शकता.
कार्यालयातील छेडछाडीच्या विरोधात उभे रहा
Stand up against harassment in the office
प्रत्येक कार्यालयात थोड्याफार प्रमाणात कर्मचाऱ्यांमध्ये आपापसात चेष्टा-मस्करी होतच असते. थोड्याफार प्रमाणात होणाऱ्या अशा चेष्टा-मस्करीकडे वरिष्ठ अधिकारी सहसा होकारात्मक दृष्टीनेच पाहतात. कारण त्यांच्या दृष्टीकोनातून यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खेळीमेळीचे वातावरण वाढते आणि एक चांगले टीमवर्क तयार होते. परंतु या चेष्टा-मस्करीने विशिष्ट सीमा ओलांडली की ती कोणाच्या तरी जीवावर बेतू शकते. म्हणून अशा प्रकारांमध्ये एखादा कर्मचाऱ्याचीच रोज चेष्टा-मस्करी होत असेल तर त्याने हा लेख वाचलाच पाहिजे.
जळगाव जिल्ह्यातील एका शाळेत एक शिक्षक नुकतेच या चेष्टा-मस्करीचे बळी पडले. बऱ्याचवेळा शाळांमध्ये एखादा शिक्षक साधा-भोळा असेल तर इतर शिक्षक आणि कर्मचाऱ्यांकडून त्याची नेहमीच चेष्टा केली जाते. त्या साध्या-भोळ्या शिक्षकाने जर विरोध केला नाही तर चेष्टेचा प्रकार नित्याचाच होतो. या शिक्षकाबाबतही तसेच घडले. काही दिवसांनी तर या प्रकाराने सर्वच सीमा ओलांडल्या. बाकीचे शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांनी त्या शिक्षकाला वर्गात शिकवितांना त्याची टिंगलटवाळी करून विद्यार्थ्यांसमोर अपमानित करण्यास सुरूवात केली. असे प्रकार रोजच सुरू झाले तेव्हा त्या शिक्षकाने कंटाळून उर्वरित शिक्षक आणि कर्मचाऱ्याविरूद्ध पोलिसात तक्रारदेखील केली. नंतर पोलिसांनी बाकीच्या शिक्षकांना समजदेखील दिली. परंतु त्या शिक्षकाचे छळसत्र सुरूच राहिले. काही दिवसांनी त्या शिक्षकाचे मनोधैर्य मोठ्या प्रमाणावर खचले. शेवटी त्याला शहरातील दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले गेले. उपचारादरम्यान त्या शिक्षकाचा मृत्यू झाला.
क्रिकेटसारखा सभ्य खेळ सुद्धा टिंगल-टवाळी, चेष्टा-मस्करीपासून सुटलेला नाही. ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज देशाचे खेळाडू अंपायर किंवा विरूद्ध संघाच्या खेळाडूंवर दबाव आणण्यासाठी अशा असभ्य बाबींचा नेहमीच आधार घेतांना अनेकवेळा आढळले आहेत. त्यांच्या मते जिंकण्यासाठी केलेल्या हा प्रकार म्हणजे डावपेचांचाच एक भाग आहे. परंतु अशा असभ्य बाबींना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने गंभीरपणे घेतलेले असून अशा प्रकारांना जबरदस्त दंडाची तरतूद केली गेली आहे. भारतातही कार्यालयातील महिला कर्मचारी टिंगल-टवाळी किंवा चेष्टा-मस्करीच्या प्रकाराला बळी पडण्याचे अनेक प्रकार घडू लागल्यावर भारत सरकारने आता अशा प्रकारांविरूद्ध कायदा देखील केला आहे. साधा-भोळा किंवा ज्युनिअर पुरूष कर्मचारीही अशा प्रकारांपासून सुटलेले नाहीत. वर उल्लेखलेली घटना हे त्याचे सत्य आणि ज्वलंत उदाहरण होय. परंतु यावर सरकार किंवा इतर कुणी तिसरी व्यक्ती येईल आणि उपाय योजना करेल याची वाट बघण्यापेक्षा काही उपाय स्वत: करण्यासारखे आहेत.
सहसा ज्या व्यक्तींमध्ये आत्मविश्वासाची कमी असते, असे लोक चेष्टा-मस्करीला लवकर आणि नेहमी बळी पडतात. अशा व्यक्तींनी मानसोपचार तज्ञ किंवा कौन्सीलर यांचा सल्ला घेऊन कार्यालयातील अशा प्रकारांविषयी चर्चा केली पाहिजे. त्यांच्याकडून अशा प्रकारांवर कोणत्या उपाय-योजना करता येतील, त्या जाणून घेतल्या पाहिजे. अर्थातच प्रत्येक ठिकाणी चेष्टा-मस्करीचे प्रकार वेगवेगळे असल्याने कोणताही एकच ठोस उपाय यावर सांगणे अवघड आहे. अमोल पालेकरचा छोटीसी बात हा चित्रपट अशाच बाबींशी संबधित आहे. या चित्रपटातील हिरो अमोल पालेकर साधाभोळा असल्याने कार्यालयात इतर कर्मचाऱ्यांच्या चेष्टा-मस्करीला नेहमी सामोरा जातो. पण तो हार मानत नाही. यावर उपाय शोधण्यासाठी तो अशोक कुमार कडे जातो, तेथे काही दिवस राहून समाजात, कार्यालयात छोट्या-मोठ्या समस्या आणि सकंटांना कसे सामोरे जायचे याचे धडे घेतो. तेथून परत आल्यावर अशोक कुमारने शिकविलेले सर्व डावपेच वापरून तो एक यशस्वी जीवन जगतो. हा चित्रपट खरोखरच अशा प्रकारांना बळी पडणाऱ्या व्यक्तींसांठी खूप प्रेरणादायक आहे. असे अनेक उपाय नेमून, आपला स्वभाव धीट करून आणि कौन्सीलरचा सल्ला घेऊन चेष्टा-मस्करीसारख्या प्रसंगांना वेळीच उत्तर देता येते.
ऑफिस टीझिंग: तुमचे अधिकार जाणून घ्या आणि कारवाई करा
एखाद्या कर्मचाऱ्याची कार्यालयात इतरांकडून छेडछाड होत असल्यास त्यांनी न घाबरता धीटपणे अशा घटनांना सामोरे गेले पाहिजे. मुळातच आपला स्वभाव भित्रा असल्यास अशा छेडछाडीला कसे सामारे जायचे याबाबत कौन्सिलरचा सल्ला घेणे केव्हाही उत्तम. पण त्यासोबत खालील उपयांनीही अशा घटनांना कसे सामोरे जाता येईल हे बघायला हवे.१. शांत राहा: तूमची कुणी छेडछाड करत असेल किंवा अनावश्यक टीका करत असेल तर अशा स्थितीत तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि आवेगपूर्ण, आक्रमक प्रतिक्रिया टाळा. संतापून अयोग्य शब्द किंवा शिव्यांचा वापर करू नका.
२. परिस्थितीचे मूल्यांकन करा: छेडछाड खेळकर किंवा दुर्भावनापूर्ण आहे का ते ठरवा. समोरचा व्यक्ती आपली चेष्टा करतो आहे का? आपल्यावर टीका करतो आहे का? आपली चूक काढून आपल्याला स्ल्ला देतो आहे का किंवा आपला आपमान करत आहे का? हे प्रथम ठरवा.
३. स्पष्टपणे बोला: चेष्टा-मस्करी करणाऱ्याला किंवा टीझर्सना विनम्रपणे सांगा की त्यांचे वर्तन अस्वस्थ किंवा अस्वीकार्य आहे आणि त्यांचे असे बोलणे आणि वागणे आपल्याला अजिबात आवडत नाही.
४. दस्तऐवज घटना: आपल्याला अपमानित करण्याच्या घटना नेहमी नेहमी होत असतील तर अशा घटनांच्यातारखा, वेळा, ठिकाणे आणि काय घडले याचे तपशीलवार रेकॉर्ड ठेवा.
५. पर्यवेक्षक किंवा एचआरशी बोला: आपल्यालाच मुद्दामून इतर कर्मचारी अपमानित करून त्रास देतात, हे नक्की झाल्यावर त्याबाबत संबंधितांकडे तक्रार करा आणि आणि त्यांचे मार्गदर्शन घ्या.
६. सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळवा: सहकाऱ्यांसोबत सकारात्मक असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे समर्थन आणि पाठिंबा मिळवा.
७. कामावर लक्ष केंद्रित करा: तुम्हाला इतर कर्मचारी त्रास देत असले तरी नेमून दिलेले काम वेळेवर पूर्ण करा. कामाच्या ठिकाणी कायम प्रोफेशनल रहा. कितीही समस्या असल्यातरी तुमच्या कामांवर लक्ष केंद्रित करा.
८. मध्यस्थी करा: जे कर्मचारी नेहमी तुमचा अपमान आणि मस्करी करतात, त्यांच्याशी मिटींग आयोजित करून थेट बोला. या कामासाठी तुमचे समर्थन करणाऱ्या मित्राचा पुढाकार घ्या. समोरासमोर चर्चा झाल्यास अनेक समस्या सोडविल्या जाऊ शकतात.
९. तुमचे अधिकार जाणून घ्या: कामाच्या ठिकाणी होणाऱ्या छळाबाबत कंपनीची काही ध्येय-धोरणे आहेत का, हे तपासा.
१०. स्वत:च्या काळजीला प्राधान्य द्या: छेडछाड, चेष्टा-मस्करी अशा समस्यातून बाहेर पडण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. तो पर्यंत तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्या.