भारत हा शेतीप्रधान देश आहे. मात्र शेतकऱ्यांपुढे सर्वात मोठी समस्या कोणती तर ती बाजार भाव आहे. शेतीमधील भविष्यातील व्यापार, ही संकल्पना अनेक दशकांपासून पाश्चात्य बाजारपेठांमध्ये प्रचलित आहे. कृषी क्षेत्राचे आधुनिकीकरण आणि उदारीकरण करण्याच्या प्रक्रियेत वायदे बाजार ही काळाची गरज आहे. वायदे बाजार किंमतीतील चढउतारांपासून बचाव करण्यासाठी, बाजारातील हालचालींवर अंदाज लावण्यासाठी आणि जोखीम व्यवस्थापित करण्यासाठी एक साधन म्हणून उपयुक्त आहे. थोडक्यात वायदेबाजार म्हणजे भविष्यातील खरेदी विक्रीचा व्यवहार होय. हा वायदे बाजार शेतकर्यांच्या दृष्टीने फायदेशीर आहे असे सांगितले जात असले तरी त्याच्या काही त्रुटी समोर आल्या असून त्यामुळे शेतकर्यांचे आणि ग्राहकांचे प्रचंड नुकसान होत आहे. परंतु हे सरकार मान्य करायला तयार नसलेेतरी आता या वायदेबाजारावर आणखी कडक नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत.
{tocify} $title={Table of Contents}
शेतीमधील भविष्यातील वायदे बाजार व्यापाराची भूमिका
वायदेबाजार ही संकल्पना शेतकर्यांसाठी आणि एकूणच शेतीव्यवसायासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. खरंतर ही संकल्पना डिसेंबर २००३ पासून सूरू झाली.आज वायदेबाजाराच्या माध्यमातून ५७ वस्तुंपैकी ४८ वस्तू कृषिशी निगडीत आहेत. वायदेबाजारात वस्तूंच्या खरेदी विक्रीचा व्यवहार वर्तमान काळात म्हणजे चालू तारखेला ठरतो, पण त्या वस्तुचा प्रत्यक्ष देणे-घेणे व्यवहार भविष्यकाळात ठरलेल्या निश्चित तारखेला करायचा असतो.
वायदे बाजार कसे कार्य करते?
वायदेबाजार (फ्युचर्स मार्केट) व्यापाऱ्यांना ( खरेदीदार) एखाद्या विशिष्ट वस्तू किंवा आर्थिक साधनाच्या खरेदी किंवा विक्रीसाठी ( या लेखात आपण शेतमाल म्हणू शकतो) भविष्यात पूर्वनिर्धारित किंमत आणि तारखेला खरेदी आणि विक्री करार करण्याची परवानगी देऊन कार्य करते.
जेव्हा एखादा व्यापारी फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट खरेदी करतो, तेव्हा ते भविष्यातील तारखेला विशिष्ट किंमतीला विशिष्ट वस्तू किंवा आर्थिक साधन (शेतमाल) खरेदी करण्याचा हक्क मूलत: विकत घेतात. त्याचप्रमाणे, जेव्हा एखादा व्यापारी फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट विकतो तेव्हा ते भविष्यातील तारखेला विशिष्ट किंमतीला वस्तू किंवा आर्थिक साधन विकण्याचा अधिकार विकत असतात.
वायदे बाजारात किंमत कशी ठरते?
फ्युचर्स कॉन्ट्रॅक्टची किंमत बाजारातील मागणी आणि पुरवठा यानुसार ठरते. या शिवाय हवामान परिस्थिती, भू-राजकीय घटना आणि आर्थिक परिस्थितीतील बदल यासह विविध घटकांवर आधारित ते चढ-उतार होऊ शकतात. खरेदीच्या वेळी कराराची किंमत प्रारंभिक मार्जिन म्हणून ओळखली जाते. कराराची कालबाह्यता तारीख जवळ आल्यावर, शेतमालाच्या किमतीत मोठे बदल झाल्यास त्याचा परिणाम करारावर होऊ शकतो. जर शेतमालाची किंमत वाढली असेल तर, कराराच्या धारकास नफा होईल, तर किंमत कमी झाल्यास, धारकाला तोटा सहन करावा लागेल. विशेष म्हणजे वायदे बाजारात एकाचवेळी आजची किंमत काय आहे आणि भविष्यातील किंमत काय असेल याची माहिती होते. मात्र ही भविष्यातील किंमत अंदाजे नसते तर त्या किंमतीवर आपण प्रत्यक्ष खरेदी विक्री करू शकतो. कारण ही किंमत ठरवितांना देशातील त्या पिकाखालील एकूण क्षेत्र, मागणी, अंदाजे अपेक्षित उत्पादन , जागतिक बाजारपेठेतील स्थिती, हवामानाचा अंदाज या सर्व बाबींचा विचार होतो. सद्यस्थितीत हजर बाजारात म्हणजे स्पॉट मार्केटमध्ये आधी माल मग सौदा तर वायदे बाजारात आधी सौदा मग माल असा व्यवहार होत असतो. वायदे बाजाराचा फायदा फक्त मोठ्या शेतकर्यांनाच होतो असे नाही. बहुतेक भारतीय शेतकरी हे छोटे आणि सम सिमांत प्रकारचे असल्यामुळे भविष्यातील किंमतींची अद्ययावत माहिती घेउन त्यांना आपली पीक पद्धती ठरविता येते आणि त्यानुसार गुंतवणूक विषयक निर्णय घेण्यास त्यांना मदत होते. जागतिक बाजारपेठेत आयात निर्यातीचा प्रवाह योग्य प्रमाणात ठेवण्यातही वायदे बाजाराचा मोलाचा वाटा आहे.
वायदेबाजारचे फायदे-
- जोखीम व्यवस्थापन: शेतकरी आणि व्यापारी स्थिर उत्पन्न सुनिश्चित करून किंमतीतील चढउतारांपासून बचाव करू शकतात.
- अपेक्षित किमतीचा शोध: फ्युचर्स मार्केट बाजाराच्या अपेक्षा प्रतिबिंबित करतात, शेतकऱ्यांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करतात.
- खरेदी-विक्री व्यवहारासाठी जास्त पर्याय : फ्युचर्स ट्रेडिंग गुंतवणूकदारांना आकर्षित करते, अधिक खरेदीदार आणि विक्रेते प्रदान करते.
- भावी किमतीचे व्यासपीठ: वायदे बाजार हे किमतीतील अस्थिरतेच्या विरोधात एक यंत्रणा प्रदान करते. वायदे बाजार खरेदीदार आणि विक्रेत्यांना त्यांच्या भावी किंमतींच्या अपेक्षा व्यक्त करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करून अपेक्षित किंमत शोधण्याची प्रक्रिया सुलभ करतात.
- कमी गुंतवणुकीत मोठा व्यवहार-वायदेबाजारात शेतमालाच्या वास्तविक मूल्याच्या तुलनेत लहान प्रारंभिक गुंतवणूक (मार्जिन) आवश्यक असते. हे व्यापाऱ्यांना कमी गुंतवणुकीसह मोठ्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यास अनुमती देते, ज्यामुळे संभाव्य परतावा वाढतो. असा व्यवहार शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या दृष्टीने फायदेशीर आहे. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की फायदा व्यापाऱ्यांच्या दृष्टीने जोखीम वाढवतो म्हणून व्यापाऱ्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे.
- मध्यस्थांचा धोका टाळता येतो- शेतकर्यांसमोर, शेतमाल उत्पादनापेक्षा शेतमाल विक्रीमध्ये मध्यस्थांकडून होणारी लूटमार व अनिश्चित बाजारभाव या सर्वात मोठ्या समस्या आहेत. यावर उपाय म्हणून देशात निरनिराळ्या कृषि उत्पादनासाठी वायदे बाजार ( मल्टी कमोडीटी एक्स्चेंज) सुरू करण्यात आले आहेत.
- जोखमीचे व्यवस्थापन: वायदे बाजार म्हणजे वस्तुच्या भविष्यातील विक्री व खरेदीबाबत, विक्रेता व खरेदीदार यांनी प्रत्यक्ष विक्रीच्या काही महिने अगोदर केलेला करार होय. विक्रेत्याला कमीतकमी भावाने विक्री करण्यापासून संरक्षण मिळावे आणि खरेदीदाराला जास्तीतजास्त दराने खरेदी टाळता यावी हा वायदेबाजाराचा उद्देश आहे. शेतकरी मालाची विक्री करण्यासाठी जेव्हा बाजारात जातो तेव्हा त्या उत्पादनाचे भाव पडलेले असतात, त्यामुळे शेतकर्याचे नुकसान होते. यावर उपाय म्हणून बँकेच्या मदतीने त्यांचा माल गोडाऊनमध्ये ठेऊन त्यांचा व्यापार्यांबरोबर व्यवहार ठरविणे व वाढीव दरातील काही भाग शेतकर्यांना देणे अशी ही योजना आहे. जोखमीचे व्यवस्थापन हे वायदेबाजाराचे मूलतत्त्व आहे.
देशाच्या आर्थिक चौकटीमध्ये वायदेबाजाराचे अनेक फायदे आहेत. वस्तुंच्या किंमतीमध्ये होत असलेल्या आत्यंतिक चढ उतारावर नियंत्रण ठेवायला वायदे बाजाराचे साहाय्य लाभते. त्यामुळे व्यापारी, मालाची साठवण करणारे आणि संबंधित प्रक्रियांमध्ये कार्य करणारे व्यापारी यांना किंमतीमध्ये प्रतिकुल चढउतार होतांना सहन कराव्या लागणार्या नुकसानामध्ये घट येते. वस्तूंच्या व्यापार्यामध्ये एकमेकांशी असणार्या व्यापारी स्पर्धेमुळे वस्तूंचा व्यापार नेहमी चालू राहतो आणि त्याचा परिणाम म्हणून किंमतीमधील चढउतारही अपेक्षेप्रमाणे सामान्य गतीनेच होत राहतात. तसेच वायदे बाजार निरनिराळ्या वस्तूंच्या किंमतीमध्ये स्थिरता आणतो. त्यामुळे स्थळ व वेळेच्या भिन्नत्त्वाच्या किंमतीबद्दल साठवणूक आणि वाहतूक खर्चाच्या प्रमाणात होतो. वायदेबाजारामुळे शेतमालाचे उत्पादन करण्यापुर्वी किंवा शेतमाल बाजारामध्ये आणण्या अगोदर वस्तूंची खरेदी विक्री करणे शक्य होते.
शेतमालाच्या किंमतवाढीला वायदे बाजार कारणीभूत नाही- सरकारचे म्हणणे
देशात सध्या राष्ट्रीय पातळीवर ४ वायदे बाजार कार्यरत आहेत. तसेच १९ प्रादेशिक वायदे बाजार कार्यरत आहेत. असे असलेतरी देशात काही भागात वायदेबाजाराशी संबधित अनेक अनधिकृत व्यवहार सुरू झाले आहेत. हे अनधिकृत व्यवहार थांबविण्यासाठी बाजारात अनधिकृत व्यवहार करणार्या ब्रोकर्सवर १ ते ५ लाख रूपयांचा दंड आकारण्याचे स्पष्ट आदेश वायदे बाजार आयोगाने ( फॉरवर्ड मार्केट्स कमिशन) कमॉडिटी एक्स्चेंजला दिले आहेत. यामुळे वायदे बाजाराच्या माध्यमातून खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्यासाठी कंत्राटे करणार्या व्यापार्यांना चोख व्यवहार करता येणे शक्य होणार आहे. तसेच फसवाफसवीचे प्रकार कमी होण्यास मदत मिळणार आहे. अन्नधान्याच्या भरमसाठी वाढीमागे वायदे बाजार कारणीभूत असल्याचे अनेकवेळा सांगितले जाते. परंतु सरकारचा अहवाल हे मान्य करीत नाही. पंतप्रधानांचे आर्थिक सल्लगार समितीचे अध्यक्ष सी. रंगराजन यांनी अन्नधान्याच्या किंमतीवर वायदा बाजाराचा काय परिणाम झाला आहे, याची माहिती मागविली होती. ही माहिती असलेल्या अहवालात वायदा बाजार आणि अन्नधान्यांच्या वाढत्या किंमती यांचा थेट संबंध असल्याचा पुरावा नसल्याचे नमूद करण्यात आले होते. कारण वायदे बाजारात वगळलेल्या धान्यांचेही भावही वाढत असल्याचे दिसून आले आहे, असे सरकारचे म्हणणे आहे. सन २०११ -१२ या आर्थिक वर्षात देशातील वायदेबाजारांमध्ये २२ लाख कोटीची शेतीमालाची उलाढाल झाली. वायदे बाजारातील एकूण उलाढालीत शेतीमालाचा वाटा १२.१२ टक्के असून वजनानुसार हा वाटा ३५.२३ टक्के आहे. हे असे आकडे अभ्यासता अन्नधान्यांच्या किंमतीवाढीला वायदे बाजार जबाबदार आहे, हे मान्य करायला सरकार तयार नाही. कारण सरकारचे अर्थतज्ञ वायदेबाजाराकडे वेगळ्या दृष्टीने पाहतात. त्यांच्या मते पुरवठा व मागणी या प्रमुख दोन बाबी विचारात घेऊन वायदेबाजारातील प्रत्येक वस्तुची किंमत ठरविली जाते. त्यासंबंधीच्या माहितीच्या आधारे किंमतीमध्ये चढ-उतार होतात. कडधान्याच्या बाबतीत बोलायचे तर आपल्या व इतर देशातील त्यांचे उत्पादन व त्यासंबंधीचे घटक (पाऊस, क्षेत्र, उत्पादकता इत्यादी), आतापर्यंतचा साठा, मागणी या गोष्टींवर ( म्हणजे त्यासंबधी उपलब्ध होत असलेल्या माहितीवर) कडधान्यांच्या वायदे बाजारातील किंमती प्रामुख्याने ठरतात. सटोडियांच्या हालचालींवर त्यामुळे मर्यादा येतात. त्यामुळे किंमतीतील चढ उताराला वायदे बाजार कारणीभूत आहे, असे अर्थतज्ञांना वाटत नाही.
वायदे बाजाराचे तोटे:
- गुंतागुंत : वायदे बाजार म्हणजेच फ्युचर्स ट्रेडिंग शेतकऱ्यांना समजणे आणि त्याचे फायदे समजून व्यापाऱ्याकडून व्हवहार करणे कठीण होऊ शकते.
- सट्टा: जास्त सट्टेबाजीमुळे किमतीत अस्थिरता निर्माण होते आणि शेतकऱ्यांना त्रास होतो.
- मार्केट मॅनिपुलेशन: मोठे व्यापारी किमतींवर प्रभाव टाकू शकतात, लहान सहभागींना प्रभावित करतात.
- पायाभूत सुविधा आव्हाने: एक्सचेंजेस, स्टोरेज आणि वाहतूक मर्यादित असल्याने वायदे बाजाराचा अपेक्षित परिणाम साधने कठीण बनते.
- बदलते नियम : विकसित होणारे नियम अनिश्चितता आणि आव्हाने निर्माण करू शकतात.
- जागरूकतेचा अभाव: शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये वायदे बाजाराबद्दल मर्यादित ज्ञान असणे.
वायदेबाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारचे प्रयत्न
सध्या अनेक प्रगत देशांसोबत भारतात दुष्काळी स्थिती गंभीर रूप धारण करू लागली आहे. त्यामुळे गत महिन्याभरात अनेक शेतीमालांचे किरकोळ बाजारातील दर दुपटीपर्यंत वाढले आहे. वायदेबाजारामुळे शेतीमालाच्या किमती अनपेक्षित पद्धतीने वाढण्यास चालना मिळते,असे आरोप सर्वस्तरातून होत आहेत. त्यामुळे वायदेबाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने गंभीरपणे हालचाली सूुरू केल्या आहेत. वायदे बाजार सुरळीत चालण्यासाठी भारताच्या वायदेबाजार आयोगाने खरेदीचे कमाल प्रमाण निश्चित केले असून विशिष्ट मर्यादेपलिकडे किंमतीच्या घसरणीस प्रतिबंध केला आहे. खरेदीदार व विक्रेत्यांकडून व्यवहार होण्यापूर्वी अनामत रकमा घेणे व नैसर्गिक आपत्तीमुळे एखाद्या पिकाचे उत्पादन घटलेतर व्यवहार बंद ठेवणे अथवा बाजार बंद ठेवणे असे नियम घालून दिले आहेत. एखाद्या कृषी मालाच्या भावात अनावश्यक पद्धतीने चढउतार होत नाही ना , याची देखरेख केली जाते. एखाद्या वस्तूची मोठ्या प्रमाणात भाववाढ झालीतर तो कृषी घटक वायदेबाजाराबाहेर काढला जातो. सद्यस्थितीत उडीद, तूर आणि तांदूळाच्या वायदे बाजारावर बंदी आहे. गहू, साखर, सोया तेल, मोहरी, सोयाबिन आणि अन्य अन्नघटकाला मात्र परवानगी आहे. बटाटा , हरभरा, सोयाबिन, सोया तेल आणि मोहरीच्या भावाच्या चढउतारावर कोटकोरपणे लक्ष ठेवले जात आहे. सोयाबिन, मोहरी, हळदीच्या व्यापारावर जास्तीची ठेव घेण्याची सूचना बाजारसमित्यांना सरकारने दिली आहे. वायदे बाजारावर नियंत्रण ठेवण्याच्या या उपायांसोबत अन्नधान्य व शेतमालाचा साठा करण्यावर कमाल मर्यादेचे बंधन व्यापार्यांवर घातले जाण्याची शक्यता सरकारने वर्तविली आहे. विशेषत: धान्य, कडधान्ये व तेलबियांबाबत याची कडक अंमलबजावणी करण्याचा सरकारचा विचार आहे. वायदे बाजारात शेतीमालांच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी काय उपाययोजना राबवावी याबाबत सरकारने एक समिती नेमली आहे. लवकरच ही समिती अहवाल सादर करणार आहे. या समितीचा अहवाल, वायदे बाजाराचा अन्नधान्याच्या किमती वाढीशी संबंध, या किंमती आटोक्यात आणण्याचे प्रयत्न या सर्व बाबी अभ्यासून वायदेबाजार खरोखरच शेतमालाच्या किमतीवाढीस कारणीभूत आढळल्यास त्यावर बंदी घालण्याचा विचार ही केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांनी अलिकडेच बोलून दाखविला आहे.
निष्कर्ष
खरंतर वायदेबाजारात फक्त सटोडियेच व्यवहार करतात असे नव्हे, त्यांच्याबरोबर हेजिंग करणारेही व्यवहार करत असतात. शेतीमालाच्या बाबतीत तर हे घटक फार महत्त्वाची भूमिका बजावतात. वायदेबाजारातील त्यांच्या व्यवहारामुळे सटोडियांवर मर्यादा येतेच, पण त्याही पेक्षा महत्त्वाचे म्हणजे वायदे बाजारामुळे ते स्वत:चे अतिरिक्त चढ-उतारापासून संरक्षण करू शकतात. अशा हेतूने वायदे बाजारात व्यवहार करणारे ज्यांना हेजर्स म्हणतात, त्यात शेतकरी येतात, प्रक्रिया उद्योग, निर्यात-आयात करणारे व्यापारी, सहकारी संस्था, इतकेच काय तर खरेदी/विक्री करणार्या शासकीय संस्था पण येतात. वायदे बाजाराचा हा फार महत्त्वाचा फायदा आहे. परंतु वायेद बाजारावर बंदी घालतांना हे संरक्षण आपण काढून घेत आहोत , हे सरकार विचारात घेत नाही. कारण सरकारने हेजिंगचे फायदे विचारात घेतलेले नाहीत. परंतु सध्या शेतमाल किंमतीच्या योग्य दराचा फायदा शेतकर्यांना होतांना दिसत नाही. त्यासाठी वायदे बाजाराला अधिकाधिक शेतकरी सन्मुख व्हावे लागेल. शेतकर्यांना प्रशिक्षण द्यावे लागेल, तरच वायदे बाजार ज्या उद्देशाने सुरू केला तो उद्देश साध्य होउ शकेल.