Unpalatable Truth About Oxytocin |
गायींमध्ये ऑक्सिटोसिन या हानिकारक संप्रेरकाचा व्यापक वापर ही दूध उद्योगातील अतिशय चिंतेची बाब आहे. ऑक्सीटोसिन अल्पावधीत दूध उत्पादनाला चालना देऊ शकते, परंतु त्याचे दीर्घकालीन वाईट परिणाम होऊ शकतात. हा लेख डेअरी उद्योगातील ऑक्सिटोसिच्या गैरवापराचा पशु कल्याण, मानवी आरोग्य आणि पर्यावरणावर होणार धोका यावर प्रकाश टाकतो आणि त्याचा गायींवर, ग्राहकांवर आणि संपूर्ण परिसंस्थेवर होणारा विनाशकारी परिणाम शोधतो.
{tocify} $title={Table of Contents}
डेअरी उदयोगातील ऑक्सिटोसिनबद्दलचे हानिकारक सत्य
दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी गाई-म्हशींना हार्मोन्सची इंजेक्शन देण्यात येतात, हा नवा प्रकार नाही. अनेक वर्षांपासून सर्रासपणे अशा हार्मोन्सच्या इंजेक्शनचा वापर सूरू आहे. वास्तविक, गाभण जनावरांमध्ये प्रसुतीच्या वेळी प्रसुतीकळा व्यवस्थित आणि वेळेत येण्यासाठी, नैसर्गिकपणे जनावर विण्यासाठी आणि पान्हा फुटण्यासाठी ऑक्सिटोसिन हार्मोन्सचे कार्य अतिशय महत्त्वाचे असते. वरील परिस्थिती असाधारण आढळल्यास ऑक्सिटोसिनचा उपयोग करण्यात येतो. तसेच दुधाळ गाई-म्हशींच्या एका गोठ्यातील गटात सर्व आहारात्मक आणि निवारात्मक बाबी समान असतांना एक-दोन दुधाळ जनावरे जर इतर दुधाळ जनावरांपेक्षा तुलनेने खुपच कमी दूध देत असतील, अशा परिस्थितीला हार्मोन्सचे असंतुलन कारणीभूत असू शकते, अशा अपवादात्मक स्थितीत काही वेळेस पशुवैद्यक हार्मोन्सच्या इंजेक्शनची शिफारस करतात. दुधाळ जनावरांमध्ये मुळातच ऑक्सिटोसिन हार्मोन्सचे प्रमाण जास्त असेल तर जनावरे वेळेच्या अगोदरच वितात आणि हे प्रमाण कमी असेलतर जनावरे नैसर्गिक गाभण काळ पूर्ण होऊन उशिरा वितात. असे या हार्मोन्सचे संतुलन करण्यासाठी ऑक्सिटोसिन सारखी हार्मोन्सची इंजेक्शने वापरली जातात. अशी इंजेक्शने पशुवैद्यकाच्या उपस्थितीत अतिशय काळजीपूर्वक देण्याची शिफारस असते. परंतु जेव्हा दुधउत्पादकांनी ऑक्सिटोसिन हार्मोन्सच्या इंजेक्शनमुळे त्वरीत दूध उत्पन्न वाढते, हे अभ्यासले , तेव्हापासून त्या इंजेक्शनचा पशुवेैद्यकाची शिफारस नसतांना केवळ जास्तीचे दूध उत्पन्न वाढण्यासाठी सर्व दुधाळ जनावरांमध्ये वापर सुरू झाला.
ऑक्सिटोसिन हार्मोन्स पशुवैद्यकाची शिफारस नसतांना सहज उपलब्ध
ऑक्सिटोसिन हे हार्मोन्स पाण्यात घालून त्यापासून ही इंजेक्शने तयार करण्यात येतात. विशेष म्हणजे बाजारात ऑक्सिटोसिन हार्मोन्सची इंजेक्शने अधिकृतपणे किंवा अनधिकृतपणे अत्यंत सहजपणे उपलब्ध होतात. तसेच त्यांची किंमतदेखील खुप कमी असते. त्यामुळे सर्व ठिकाणी या इंजेक्शनचा वापर सूरू आहे. पशुवैद्यकाची शिफारस नसतांना आणि काहीही आवश्यकता नसतांना केवळ अनैसर्गिक दूध वाढीसाठी जर अशी इंजेक्शने अति प्रमाणात वापरल्यास जनावरांच्या प्रजनन क्षमतेवर त्याचा विपरीत परिणाम होतो. बर्याचवेळा अशी जनावरे कायमस्वरूपी अनुत्पादक होण्याचा धोका असतो. अशी इंजेक्शने दुधाळ जनावरांना दिल्याबरोबर त्यांच्या शरीरात इंजेक्शनमधील हार्मोन्स त्वरीत शोषले जाते आणि त्याचा परिणाम ताबडतोब दाखविते. सर्वात प्रथम गर्भाशय वेगाने आंकुचन पावते आणि वेगाने दूध स्तनात उतरते आणि दुधाळ जनावरांना जलद पान्हा फुटतो. हे सर्व होत असतांना दुधाळ जनावरांना अंतर्गत वेदना होतात.
ऑक्सिटोसिन हार्मोन्सचे गाई-म्हशींवर परिणाम
तीन वर्षे सतत अशी इंजेक्शने दिल्यास गाई-म्हशी कायमस्वरूपी भाकड होऊ शकतात. तसेच काही जनावरांमध्येतर कँसरसारखे आजार निर्माण होऊ शकतात. विकलांग वासरे पुढील पिढीसाठी जन्माला येतात. आतातर फक्त दूध वाढविण्यासाठी नव्हेतर इतर फसवणूकीसाठी सुद्धा हार्मोन्सच्या इंजेक्शनचा वापर सुरू झाला आहे. मुळत: कमी दूध देणारी जनावरे २-४ हजारात अशा कमी किमतीत खरेदी करायची, त्यांना हार्मोन्सयुक्त इंजेक्शनचा वारंवार मारा करून त्यांचे दूध अनैसर्गिकरित्या वाढवून अशी जनावरे दुधाळ असल्याचे भासवायचे . त्यानंतर अशी जनावरे २५ ते ३० हजारात विकायची.असे प्रकार काही ठिकाणी उघडकीस आलेले आहेत. तसेच जे पशु-पक्षी मांसासाठी विकले जातात, त्यांनासुद्धा हार्मोन्सची इंजेक्शने वारंवार देऊन त्यांना कमी वयातच आकाराने आणि वजनाने मोठे केले जाते, कारण अशा जनावरांना किंमत चांगली मिळते. फळे आणि भाजीपालासुद्धा या हार्मोन्सच्या मार्यापासून सुटलेली नाहीत. आजकाल फळे आणि भाजीपाला लवकर तयार व्हावा, त्यांना गर्द हिरव्या रंगाची किंवा पिवळ्या रंगाची चकाकी यावी, त्यांचा आकार नैसर्गिक आकारापेक्षा मोठा व्हावा यासाठी फळे आणि भाजीपाल्यांवर ऑक्सिटोसिन इंजेक्शनचा मारा केला जातो. विशेषत: टरबूज, भोपळा यासारख्या फळांवर अशा पद्धतीचा वापर आढळला आहे.
ऑक्सिटोसिन हार्मोन्सचे मनुष्यावर परिणाम
हार्मोन्सयुक्त इंजेक्शनचे दुष्परिणाम गाई-म्हशींवर तर होतातच त्याबरोबर मनुष्यावर देखील या हार्मोन्सचे परिणाम होतात. जनावरांत सतत अशी इंजेक्शने उपयोगात आणल्यास हार्मोेन्सचे अंश दूधात किंवा मांसात उतरतात. गरोदर महिलांनी असे दूध प्यायल्यास त्यांच्या गर्भाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. एवढेच नव्हेतर जास्त प्रमाणात हे दूध प्यायल्यास गर्भपाताचा धोकाही संभवतो. लहान मुलांनी असे दूध सतत प्राशन केल्यास त्यांच्या शरीरातील नैसर्गिक हार्मोन्सचे असंतुलन होते. वयात येण्याअगोदरच लहान मुलांमध्ये तारूण्याची लक्षणे दिसू लागतात. म्हणजे अकाली तारूण्याचा धोका निर्माण होतो. काही मुलांमध्ये मुलीसारखे गुणधर्म विकसित होऊ शकतात. काहींमध्ये तर उशिरा मिशा व दाढी येणे किंवा मुलींना मिशा फुटणे असे अनैसर्गिक गुणधर्म दिसतात. पचनसंस्थेचे आजार मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. असे हे मानवी शरीरात झालेले हार्मोन्सचे असंतुलन पुढे अनेक विकारांना निमंत्रण देते. त्वचेवर पांढरे डाग असणारा व्यक्ती अगोदर गावात एखादा असायचा, परंतु आता प्रत्येक कॉलनीत असे त्वचा विकार असलेले रोगी आढळू लागले आहेत, यामागे हार्मोन्सयुक्त दुधाचा प्रभाव आहे का याचा आता शास्त्रज्ञ अभ्यास करीत आहेत.
ऑक्सिटोसिन इंजेक्शन कायद्यानुसार प्रतिबंधीत
बहुतांश दूध उत्पादकांना ऑक्सिटोसिन इंजेक्शनमुळे दूध वाढते, एवढेच माहीत आहे. परंतु हे इंजेक्शन नेमके कशाचे?कशासाठी जनावरांना देण्याची शिफारस आहे? त्याचे दुष्परिणाम कोणते?हे माहीत नसते. जसे आपण जनावरांना चारा, खुराक खायला देतो, आजारी पडल्यास औषधे देतो तसेच हे एक औषध, असा समज दूध उत्पादकांचा असतो. केवळ अतिरिक्त दुधासाठी गाई आणि म्हशींना ऑक्सिटोसिन इंजेक्शन टोचण्यास बंदी आहे. आपल्या कायद्यानुसार ह्या इंजेक्शनचा वापर करणे कायद्याने प्रतिबंधीत आहे. (प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएलिटी टू ऍनिमल्स ऍक्ट, १९६० सेक्शन १२ आणि फुड ऍण्ड ड्रग अडल्टरेशन प्रिव्हेन्शन ऍक्ट,१९६०).इतकेच नव्हेतर गरोदर बाईच्या उपचारासाठी वैद्यकीय दृष्ट्या देखील हे औषध प्रसुती तज्ञांच्या प्रीसक्रीप्शन शिवाय उपलब्ध होऊ शकत नाही. (सेड्युल एच ड्रग). परंतु कायद्याबाबत दूध उत्पादक अज्ञानी आहेत. त्यामुळे अतिशय स्वस्तात आणि सहज उपलब्ध होणारी अशी ऑक्सिटोसिन हार्मोेन्सची इंजेक्शने सर्रासपणे सर्व ठिकाणी वापरली जात आहेत.
ऑक्सिटोसिन इंजेक्शनचा गैरवापर टाळण्यासाठी उपाययोजना
टरबूजमध्ये हार्मोन्सची इंजेक्शने टोचून त्याचा आकार नैसर्गिक आकारापेक्षा मोठा करण्याचा काही शेतकर्यांचा प्रताप एका वृत्तवाहिनीने काही महिन्यांपूर्वी अनेकवेळा दाखविला होता. तसेच गेल्या वर्षी मंबईतील अनेक तबेल्यांमध्ये गाई-म्हशींना हार्मोन्सची इंजेक्शने देण्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाने अन्न व औेषध प्रशासनाच्या सहकार्याने खास उपायजयोजना आखण्यास सुरूवात केली होती. त्या उपाययोजनांचाच भाग म्हणून शासनाने काही निर्णय घेतले आहेत. सुट्या प्रमाणात हे इंजेक्शन सहजासहजी आणि स्वस्तात उपलब्ध असल्याने त्याची मोठ्या प्रमाणात विक्री होते, हे टाळण्यासाठी यापुढे विक्रेत्यांना सुट्या पद्धतीने हामोन्सची विक्री करता येणार नाही. अशी हार्मोन्सची औषधे स्वतंत्रपणे विशिष्ट पॅकमध्ये विकता येतील. तसेच अशी औषधे विकतांना नोंदणीकृत पशुवैद्यकांची शिफारस सक्तीची करण्यात आली आहे. या उपाययोजना शासन स्तरावर करण्यात आलेल्या असल्यातरी हार्मोन्सचा गैरवापर टाळण्यासाठी आणखी काही उपाययोजना कराव्या लागतील. त्या अंतर्गत अशी हार्मोन्सची औषधे अतिशय स्वस्तात मिळतात, त्यांच्या किमती वाढविल्यास त्यांच्या वापरावर मर्यादा येऊ शकतात. तसेच पशुवैद्यक आणि बाजारसमित्यांनी पुढाकार घेऊन पशुपालक आणि औषध विक्रेते यांचे हार्मोन्सच्या इंजेक्शनच्या दुष्परिणामांबाबत प्रबोधन करणे. हार्मोन्सचे इंजेक्शन गैरप्रकार आणि नोंदणीकृत पशुवैद्यकाच्या शिफारसीशिवार वापर करण्यांवर कायद्यानुसार जबर शिक्षेचा कायदा करणे, असे आणखी उपाय योजावे लागतील.
निष्कर्ष
दुग्धव्यवसायात ऑक्सिटोसिनच्या वापरामुळे दूरगामी परिणाम होतात ज्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. वाढलेला ताण, आरोग्य समस्या आणि कमी होणारे आयुर्मान यांसह गायींवर हार्मोनचे हानिकारक परिणाम हे स्पष्ट संकेत आहेत की ही पद्धत टिकाऊ नाही. पशु कल्याण आणि पर्यावरणीय संतुलनाला प्राधान्य देऊन आपण अधिक मानवी आणि शाश्वत दुग्धशाळेच्या पद्धतींचा अवलंब करणे अत्यावश्यक आहे. ऑक्सिटोसिन-मुक्त दुग्धजन्य उत्पादनांना समर्थन देऊन, धोरणात बदल करून आणि या विषयाबद्दल शिक्षण आणि जागरूकता वाढवून हे साध्य केले जाऊ शकते.