{tocify} $title={Table of Contents}
कृषी हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, लाखो शेतकरी त्यांच्या उपजीविकेसाठी त्यावर अवलंबून आहेत. तथापि, वाढत्या लोकसंख्येच्या अन्नाच्या गरजा पूर्ण करण्याचा वाढता दबाव, हवामान बदल, मातीचा ऱ्हास आणि पाण्याची टंचाई यासारख्या आव्हानांसह पीक उत्पादन आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी नाविन्यपूर्ण उपायांची आवश्यकता आहे. असाच एक उपाय म्हणजे पीक संजीवकांचा वापर, ज्याने जगभरातील कृषी पद्धतींमध्ये क्रांती घडवून आणली आहे. त्यांचे सिद्ध फायदे असूनही, भारतीय शेतीमध्ये वाढ नियामकांचा अवलंब मर्यादित आहे. हा लेख भारतीय शेतीमध्ये वाढ नियामकांना आत्मसात करण्याची, पीक उत्पादकता वाढवण्यासाठी, पर्यावरणावरील प्रभाव कमी करण्यासाठी आणि देशाच्या वाढत्या लोकसंख्येसाठी अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या त्यांच्या संभाव्यतेचा शोध घेण्याची गरज अधोरेखित करतो.
भारताला कृषी क्षेत्रातील वाढ नियंत्रकांची गरज
प्रगत देशांमध्ये आधुनिक शेतीसोबतच शेतीच्या यांत्रिकीकरणावर सध्या जास्तीतजास्त जोर दिला जात आहे. पण त्याचबरोबर पीक संजीवकाचाही उपयोग पीक उत्पादनवाढीसाठी मोठ्या प्रमाणात करून घेतला जात आहे. अनेक संजीवके वनस्पतीमध्ये नैसर्गिकरीत्या तयार होत असतात. मनुष्यप्राण्यामध्येही अनेक क्रिया संजीवकामुळे होत असतात. भारतीयांना तर संजीवकाची ओळख पूवीपासून होती. याचे पुरावे स्पष्टपणे पुराणामध्ये आढळतात. कारण आपल्या पुराणामध्ये संजीवनीविद्येचा उल्लेख आहे. सकाळी साळी पेरून संध्याकाळी त्याचा भात शिजवून खाण्याचा उल्लेख पूराणात आढळतो. याचा स्पष्ट असा अर्थ होतो की आपल्या पूर्वजांना संजीवकांची विद्या अवगत होती. परंतु काळाच्या ओघात ही विद्या मागे पडली आणि आज आपण पीक उत्पादन वाढीत संजीवकाचा हवा तसा वापर अजुनही सुरू केलेला दिसत नाही.
द्राक्ष शेतीमुळे संजीवकाच्या वापराकडे शेतकर्यांचे लक्ष
महाराष्ट्रात द्राक्ष बागायतदारांमुळे संजीवकाच्या वापराकडे शेतकर्यांचे लक्ष वळले आणि तेथूनच शेतीत संजीवकाचा व्यावसायिक दृष्टीने वापर सूरू झाला. फळांचा आकार मोठा होण्यासाठी आणि उत्पादन वाढविण्यासाठी जिबरेलिक ऍसिडचा उपयोग मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागायतदारांनी सुरू केला. त्यामुळे द्राक्षामध्ये हवे तसे बदल घडवून आणता आले. खर्या अर्थाने यामुळेच शेतकर्यांना संजीवकाची प्रथम माहिती झाली. आता इतर पिकांमध्येही वेगवेगळ्या संजीवकाचा वापर ज्ञात होत आहे. संजीवकाची उपयोगिता पाहता शेतकर्यांनी त्याचा वापर करण्यात गंभीरपणा दाखवून जशी रासायनिक खतांच्या वापरात पुढाकार वृत्ती दाखविली , तशीच दाखविली पाहिजे.
पीक संजीवके म्हणजे ग्रोथ हार्मोन्स
खरं तर संजीवक हे एक प्रकारचे रासायनिक द्रव्य होय. कोणत्याही सजीवामध्ये ते असते. पीक संजीवके ही ग्रोथ हार्मोन्स किंवा प्लाण्ट ग्रोथ हामोन्स या नावाने ओळखली जातात. पिकांच्या वाढीवर आणि अंतर्गत क्रियेवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य ही संजीवके करतात. अल्प प्रमाणात लागणार्या या संजीवकांचे दृष्य परिणाम फार उपयुक्त ठरतात. खरं तर नैसर्गिकरित्या वेगवेगळी संजीवके पिकात आढळून येतात, तरी सुद्धा त्यांचे वनस्पतीत असलेले प्रमाण योग्य परिणाम साधन्याच्या दृष्टीने कमी असते. अपेक्षित परिणाम साधण्यासाठी बाह्य वापरातून हे प्रमाण वाढविता येते. भाजीपाला उत्पादनवाढीच्या दृष्टीने निरनिराळ्या संजीवकांचा निरनिराळ्या पिकांमध्ये योग्य प्रकारे उपयोग करता येतो. विविध प्रकारची संजीवके ही ऑक्झिन, जिबरेलीन, सायटोकायनीन, वाढ निरोधक , इथिलीन आणि ग्रोथ रिटार्डंट्स् ह्या सहा गटांमध्ये प्रामुख्याने विभागली आहेत. अनेक पिकांमध्ये संजीवकांचा योग्य प्रकारे वापर करून अनेक चांगल्या बाबी साध्य करता येतात. अयोग्य संजीवकांचा किंवा अयोग्य प्रमाणात त्यांचा वापर केल्यास फायदा होण्याऐवजी नुकसानच होऊ शकते, त्यामुळे शेतकर्यांनी पीक संजीवकांचे नेमके कार्य, त्यांची वाढीच्या अवस्थेतील आवश्यकता आणि साधला जाणारा अपेक्षित परिणाम याबाबतचा शास्त्रीय दृष्टीकानातून विचार करणे गरजेचे आहे.
पीक उत्पादनामध्ये पीक संजीवकाचा वापर-
- बियाणाची उगवण अधिक चांगली होणे.
- वनस्पतीची अभिवृद्धी करतांना, खास करून कलम करतांना भिन्न वनस्पतीच्या पेशी एकजीव करण्यासाठी.
- पिकाची जोमदार वाढ होणे.
- फळझाडांचा बहर नियंत्रित करणे.
- मादी फुलाचे प्रमाण वाढून फळांची संख्या वाढणे.
- फुलांची आणि फळांची गळ थांबविणे.
- फळे एकसारखी पिकणे आणि फळांचा रंग आकर्षक असणे.
- फळांचा किंवा भाजीपाल्याचा टिकाऊपणा वाढविणे.
- बिगर हंगामी उत्पादन घेणे.
- प्रतिकुल हंगामात पिकांचे संरक्षण करणे.
- पाणी टंचाईवर मात करणे.
- रोग कीड प्रतिबंधक गुणधर्म वाढविणे.
- वाढ नियंत्रण करणे.
- फूल- फळ संख्या मर्यादित ठेवणे.
- टवटवीतपणा वाढविणे.
- पिकाची साठवणीतील घट कमी करणे.
- भाजीपाल्याला अपेक्षित रंग आणणे.
- भाजीपाला पीक काढणीनंतरचे आयुष्य वाढविणे.
- वनस्पतीत काटकपणा आणि रोगप्रतिकारक शक्ती आणणे.
- तण नियंत्रण करणे.
अशा प्रकारे योग्य संजीवकाचा वापर करून योग्य तो परिणाम साधता येतो. संजीवके वापरण्याच्या निरनिराळ्या पद्धती आहेत- जसे बियाण्यावर संजीवकाची प्रक्रिया करणे, रोपांची मुळे बुडविणे, कोरड्या भुकटीचा वापर करणे, पानांवर किंवा फळांवर फवारणी करणे, द्रावण तयार करून जमिनीतून देणे, द्रावण तयार करून जमिनीवर फवारणी करणे, फक्त विशिष्ट भागावर फवारणी करणे.
संजीवकाच्या वापरात अपेक्षित वाढ नाही
पीक संजीवकाचे उपयोग आणि त्यांच्या वापरामुळे होणारे फायदे पाहता असे लक्षात येते की पीकांवर फवारण्यासाठी संजीवकांचे प्रमाण अतिशय अल्प असलेतरी त्यांचा परिणाम मात्र फार मोठा असतो. मग प्रश्न असा उभा राहतो की जशी रासायनिक खतांच्या बाबतीत हरितक्रांतीच्या वेळी शेतकर्यांनी कमालीची उत्सुकता आणि गांभीर्य दाखविले, तसे पीक संजीवकांबाबत घडले नाही. रासायनिक खतांच्या तुलनेत , खरं तर पीक संजीवकाचें विविध उपयोग आहेत आणि लागणारे प्रमाण सुद्धा अतिशन अल्प आहे. तरी सुद्धा पीक संजीवकाचा वापर अपेक्षितरित्या वाढू शकलेला नाही. आधुनिक तंत्रज्ञान वापराकडे आपले शेतकरी जरा उशिराच पसंती देतात, असे असले तरी पीक संजीवकाच्या वापराकडे शेतकरी जरा जास्त उशिर लावत आहेत. गेल्या दशकापासून जीवाणू खतांच्या वापरात चांगली वाढ झाली, सेद्रिय शेतीकडे शेतकरी वळू लागले, आधुनिक सिंचनाच्या पद्धती शेतकर्यांच्या शेतात दिसू लागल्या. परंतु पीक संजीवकांच्या वापराबाबत शेतकर्यांसोबत सरकार आणि कृषी विद्यापीठे सुद्धा शेतकर्यांना योग्य ती जाणीव करून देत नाहीत, असे निदर्शनास येत आहे. जशी शेततळे, ठिबक सिंचन ऊभारण्याबाबत योजना राबविल्या गेल्यात , तशा योजना पीक संजीवके वापराबाबत राबविण्याची आता गरज निर्माण झाली आहे.
निष्कर्ष
संपूर्ण महाराष्ट्रात संजीवकाच्या वापराबाबत एखादी योजना राबविणे विशेष अवघड काम नाही. कारण संजीवकांचा प्रति हेक्टरी वापर हा रासायनिक किंवा इतर खतांच्या तुलनेत खूप कमी असतो. तसेच संजीवकाची फवारणी करण्यासाठी फार मोठी आधुनिक मशिनरी लागते, असे सुद्धा नाही. इतर योजनांवर होणार्या खर्चाच्या तुलनेत पीक संजीवनी योजना राबविल्यास विशेष खर्च येणार नाही. तसेच यासाठी फार कुशल व्यक्ती किंवा तंत्रज्ञान लागतेच ,असे नाही. विशेष म्हणजे पीक संजीवकाचे दृष्य परिणाम शेतकर्यांना त्वरीत मिळणार आहेत. त्यामुळे ही योजना फक्त एखाद्या हंगामापुरती जरी राबविली आणि अपेक्षित परिणाम शेतकर्यांना जर लगेच मिळालातर पुढील हंगामात शेतकरी स्वत:हून पीक संजीवकांचा वापर सुरू करतील. सरकारने तर येणारे २०१२ हे वर्ष पीक संजीवकवर्ष म्हणून जाहीर केले पाहिजे आणि १०० टक्के अनुदानावर किंवा काही अंशी अनुदानावर सर्व प्रकारच्या पीक उत्पादनासाठी शेतकर्यांना संजीवके उपलब्ध करून दिली पाहिजेत. जशी हरितक्रांती भारतीय शेतकर्यांना एक नवीन ओळख मिळवून दिली, त्यापेक्षा मोठी क्रांती पीक संजीवकाच्या योग्य वापरामुळे निश्चितच घडू शकेल.