Orchard Cultivation |
शतकानुशतके फळबाग लागवड हा महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राचा अविभाज्य भाग आहे. वैविध्यपूर्ण हवामान महाराष्ट्र राज्यास आंबा, केळी, द्राक्षे, डाळिंब आणि पेरू यासह विविध प्रकारच्या फळांच्या वाढीसाठी आदर्श परिस्थिती प्रदान करते. अलिकडच्या वर्षांत, महाराष्ट्रात फळबाग लागवडीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे, कारण शेतकरी त्यांच्या पिकांमध्ये विविधता आणण्याचा आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करतात.
महाराष्ट्राच्या अन्न सुरक्षा आणि शाश्वततेमध्ये फळबागांची भूमिका
महाराष्ट्रात अनेक प्रकारची शेती केली जाते. अन्नधान्य शेती, वनशेती, फळशेती, भाजीपाला शेती, फुलशेती, हरितगृह शेती असे अनेक प्रकार आणि उपप्रकार असून मिश्रशेतीही मोठ्या प्रमाणावर केली जाते. शेतीव्यवसायाला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय, शेेळीपालन, कुक्कुटपालन यांचाही समावेश असतो. परंतु या सर्व प्रकारच्या शेतीच्या आणि जोडधंद्याच्या तुलनेने फळबाग लागवडीने चांगली कमाई होऊ शकते. कारण इतर शेतीप्रकारांसोबत केलेली फळशेती ही आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असल्याचे सिद्ध झाले आहे. फळझाडांच्या लागवडीच्या शास्त्राला फलसंवर्धन शास्त्र किंवा फलोद्यान विद्या असे म्हणतात. महाराष्ट्रासाठी पडणारा पाऊस, जमिनी , पीकपद्धती, वनस्पती आणि उष्णतामान या सर्वांचा विचार करून महाराष्ट्राचे ९ कृषिहवामान विभाग पाडले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात हवामान कधीही सारखे नसते. प्रत्येकवेळी वेगवेगळ्या भागात वेगवगळे हवामान असते. महाराष्ट्रात अतिशय कमी पाऊस पडणारे तसेच भरपूर पाऊस पडणारे प्रदेश आहेत. उन्हाळ्यात कडक ऊन पडून ४५ अंश सेल्सीअसपर्यंत तापमान जाणारा विदर्भ, खान्देशसारखा प्रदेश आहे. तसाच हिवाळ्यात १० अंश सेल्सीअस पेक्षा कमी तापमान असणारा महाबळेश्वरसारखा , अधिक आर्द्रता असणारा कोकण प्रदेश आहे. अशा वेगवेगळ्या प्रदेशात विविध प्रकारच्या फळबागा वाढू शकतात. जसे कोकणात आंबा आणि काजू लागवड, पश्चिम महाराष्ट्रात द्राक्षे, पेरू आणि डाळिंब लागवड, उत्तर महाराष्ट्रात केळी लागवड, नागपुर-अमरावती भागात संत्रा लागवड अशी विविध भागात विविध प्रकारची फळे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. तसेच महाराष्ट्रात काही ठिकाणी माळरान, डोंगरउतार, तर काही ठिकाणी सपाट प्रदेश आहे. तसेच पोयट्याच्या जमिनी, लालसर जमिनी, काळ्या जमिनी, पांढर्या जमिनी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनी निरनिराळ्या फळांच्या वाढीस उपयुक्त आहे. म्हणूनच अशा वेगवेगळ्या जमिनीवर वेगवेगळ्या फळबागा लागवडीस मोठा वाव आहे. अशी महाराष्ट्रातील हवामान आणि जमिनीची विविधता पाहता इतर प्रकारच्या शेती सोबतच शेतकर्यांनी फळबागशेती अवलंबल्यास त्यांना निश्चितच शेतीव्यवसायाचा दर्जा उंचवण्यास मदत होईल. अशाप्रकारे जमीन आणि हवामान विविधतेसोबतच फळबागांकडे वळण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण बाबी स्पष्ट करता येतील.
महाराष्ट्रातील बारमाही, आठमाही आणि हंगामी स्वरूपाच्या ओलिताखालील क्षेत्रात हळूहळू वाढ होत आहे. त्यामुळे ज्या फळझाडांना ठराविक काळापुरते पाणी लागते अशा फळझाडांची लागवड करण्यास अधिक वाव निर्माण झाला आहे. तसेच आधुनिक सिंचनाच्या नवीन पद्धती जसे ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन यांचा फळबागायतीत वापर फायद्याचा ठरला आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा जास्तीतजास्त वापर होऊन फळबागाघेण्याकडे शेतकर्यांचा कल वाढत आहे. महाराष्ट्रात फळझाडांवर संशोधन करणारी चार कृषी विद्यापीठे आहेत. तसेच फळझाडांवर संशोधन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी संशोधन कें्रेद्रेही आहेत. या सर्व ठिकाणी त्या त्या भागात यशस्वी ठरलेल्या फळझाडांवर तर संशोधन सुरू आहेच त्यासोबत विविध भागात कोणकोणती वेगवेगळी नवीन फळे घेता येतील याचीही शक्तता पडताळली जात आहे. फळांचे उत्पादन आणि गुणवत्ता वाढविणे, फळे काढल्यानंतर त्याचा ताजेपणा टिकविणे, त्यावर प्रक्रिया करणे, याबाबतीत आता शेतकर्यांना सहजपणे मार्गदर्शन आणि तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. तसेच सध्या फळांची वाहतुक करण्यासाठी अलीकडच्या काळात दळवळणाच्या अनेक बाबींमध्ये वाढ आणि सुधारणा होत आहे. पक्के आणि चारपदरी रस्ते, मालमोटारी, मालगाड्या, रेल्वेमार्ग इत्यादी वाहतुकीची साधने वाढलेली आहेत. दूरच्या मालवाहतुकीसाठी जलमार्ग आणि हवाईमार्ग अशा सुविधाही विकसित झालेल्या आहेत. टपाल आणि दुरध्वनी या यंत्रणेसाबेतच आता मोबाईल, फॅक्स, इ-मेल, वेबसाईट, व्हिडीओ कॉन्फरन्स इत्यादी आधुनिक दळवळणाच्या सोयी मोठ्या प्रमाणात आणि सर्वांना सहजपणे वापरता येतील अशा पद्धतीने विकसित झालेल्या आहेत. या सुविधांमुळे बाजारपेठेतील उलाढाल, पुरवठा आणि मागणी, फळांची योग्य तेथे वाहतुक यात सुटसुटीतपणा आणि जलदपणा आलेला आहे. शासनाचा कृषि विभाग, कृषी विद्यापीठे आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्याकडून तर आता मोबाईल तसेच इतर माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती सरळपणे शेतकर्यांना दिली जात आहे. फळबाग लागवडीसाठी महाराष्ट्रशासनाने सर्वप्रथम १९९१० पासून रोजगार हमी योजनेद्वारे फळबाग लागवड सुरू केली. या योजनेत निरनिराळ्या १९ प्रकारच्या फळपिकांचा आणि ४ मसालेपिकांचा समावेश आहे. फळबागा लागवडीसाठी आणि बागांची ३ वर्षापर्यंत जोपासना करण्यासाठी शासन आता अनुदान देत आहे. याचबरोबर फळबाग लागवडीसाठी लागणारी तांत्रिक माहिती तसेच कलमे, रोपे यांचा पुरवठाही फळबाग विकास योजनेमार्फत केला जात आहे. या योजनांमुळे फळबागा लागवडीस चालना मिळाली असून मोठ्या प्रमाणात फळबागांची लागवड दरवर्षी वाढत आहे.
फळबाग लागवड यशस्वी करण्यासाठी आता अनेक खासगी तसेच सहकारी संस्था कार्य करत आहेत. द्राक्षाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र राज्य बागाईतदार संघ तसेच डाळिंब, बोर, संत्रा, केळी इत्यादी फळपिकांसाठी असे संघ स्थापन झालेले आहेत. अनेक ठिकाणी बागाईतदारांचे लहान मोठे संघ, कृषीप्रतिष्ठान, महाग्रेप, राष्ट्रीयीकृत बँका ह्या फळबागा लागवड, उत्पादन आणि विक्रीसाठी विविध प्रकारे मदत करीत आहेत. फळे नाशवंत असणे ही फळबाग लागवडीची मोठी समस्या असल्यामुळे फळांची काढणी झाल्यानंतर करावयाचे व्यवस्थापन फार महत्त्वाचे असते. फळांची साठवण करण्यापूर्वी फळे थंड करणे, शीतगृहात साठविणे, व्यवस्थित पॅकिंग करणे महत्त्वाचे असते कारण जेणेकरून काढणीनंतर फळांचे कमीतकमी नुकसान होइल किंवा अजिबात नुकसान होणार नाही. तसेच फळांपासून टिकाऊ पदार्थ तयार करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. द्राक्षे, अंजीर, बोरे ही फळे सुकविणे, संत्रा, आंबा, द्राक्षे, लिंबु यांचा रस काढून टिकविणे, आवळा, लिंबु, आंबा, करवंदे यापासून लोणची बनविणे, असे प्रक्रियाउद्योग निर्माण होत आहेत. यामुळे फळबागा लागवडीचा दिवसेंदिवस अधिकच वाव वाढत आहे.
फळांपासून तयार केलेल्या टिकाऊ पदार्थांची आणि ताज्या फळांची बाहेरच्या देशातुन मागणी वाढत आहे. आखाती देश, युरोपियन देश, आपले शेजारील राष्ट्रे-बांग्लादेश, श्रीलंका, नेपाळ तसेच इतरही काही देशांकडून फळांची मागणी वाढत आहे. विशेषकरून जानेवारी ते जून याकाळात या देशांमध्ये उपलब्ध नसणारी परंतु आपल्याकडे तयार होणारी फळे निर्यात करण्याची संधी निर्माण झाली आहे. फळे निर्यात केल्यामुळे गुणवत्तापुर्वक फळे पिकविणार्या फळबागायतदारांना योग्य बाजारभाव मिळाल्यामुळे फायदा तर होतोच त्याबरोबर देशाला परकीय चलन उपलब्ध होते. ग्लोबल वार्मींगमुळे सद्य:स्थितीत पूर, वादळ, बेमोसमी पाऊस, धुके, गारपीट या नैसर्गिक आपत्तींचा वारंवार सामना करावा लागतो. काही फळांसाठी उपलब्ध असलेल्या पीक विमा योजनेमुळे शेतकर्यांना आता नैेसर्गिक आपत्तीत काही प्रमाणात नुकसान भरपाई मिळण्याची सोय उपलब्ध झाली आहे. या सर्वबाबींमुळे गेल्या दशकात फळबागाखालील क्षेत्रात ३०० ते ४०० टक्के इतकी वाढ झाली असून सध्या राज्यात १३.५ लक्ष हेक्टर क्षेत्र फळबागाखाली असून त्यापासून सुमारे ११.५ दशलक्ष टन उत्पादन होते. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण मुख्य फळपिकाखालील क्षेत्रापैकी आंबा, संत्री, काजू, द्राक्ष व चिक्कू यांचा वाटा अनुक्रमे २५.१३, १४.९७, १२.४०, ११.९४ आणि १२.४० टक्के इतका आहे. भारतातील प्रमुख फळपिकाखालील क्षेत्रामध्ये द्राक्ष, संत्री व केळी या फळपिकांचा महाराष्ट्र राज्याचा हिस्सा अनुक्रमे ७४ टक्के(०.२९ लाख हेक्टर), संत्री ५६ टक्के(०.९२ लाख हेक्टर) व केळी १४ टक्के (०.७२ लाख हेक्टर) असल्याचे दिसून आले आहे. देशातील एकूण द्राक्षे व केळी उत्पादनापैकी अनुक्रमे ६५ टक्के व ५० टक्के उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते. हे सर्व फळबाग लागवडीचे फायदे आणि आकडे अभ्यासता असे दिसून येते की महाराष्ट्रातील शेतकरी आता वेगाने फळबाग लागवडीकडे वळत आहे. जे शेतकरी अजुनही पारंपारिक त्याच त्याच प्रकारची शेती दरवर्षी तेच तेच पीक पिकवून अजुनही करत असतील त्यांनी आता फळबाग लागवडीकडे वळण्यासाठी गांभीर्याने विचार करायला हवा.
महाराष्ट्रात फळबाग लागवडीला अनेक कारणांमुळे अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रथम, ते राज्याच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, अनेक शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांना रोजगार आणि उत्पन्नाच्या संधी प्रदान करते. दुसरे म्हणजे, फळबागांची लागवड राज्याच्या अन्न सुरक्षेमध्ये आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध असलेली विविध फळे आणि काजू प्रदान करून योगदान देते. तिसरे म्हणजे, रासायनिक वापर कमी करणे, मृदा संवर्धन आणि जैवविविधता संरक्षण यासारख्या शाश्वत शेती पद्धतींना प्रोत्साहन देऊन पर्यावरणाचे रक्षण करण्यात मदत होते. चौथे, फळबाग लागवडीमध्ये कृषी-पर्यटनाच्या संधी निर्माण करून राज्याचा पर्यटन उद्योग वाढवण्याची क्षमता आहे. म्हणून, आर्थिक सहाय्य, प्रशिक्षण आणि विस्तार सेवा आणि विपणन सहाय्य प्रदान करणे यासारख्या विविध उपायांद्वारे महाराष्ट्रात फळबाग लागवडीला प्रोत्साहन देणे आणि त्यांना समर्थन देणे महत्वाचे आहे. असे केल्याने, आम्ही राज्याच्या कृषी क्षेत्राचा शाश्वत विकास सुनिश्चित करण्यासाठी, शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि सर्वांसाठी निरोगी आणि शाश्वत अन्न प्रणालीला प्रोत्साहन देण्यासाठी मदत करू शकतो.