Vegetable Cultivation |
भारताच्या कृषी क्षेत्राचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये भाजीपाला लागवड हा राज्याच्या कृषी क्षेत्राचा एक महत्त्वाचा घटक आहे. हे केवळ स्थानिक अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देते, परंतु लाखो लोकांसाठी अन्न सुरक्षा आणि पोषण सुनिश्चित करण्यात देखील ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, या लेखात आपण महाराष्ट्रातील भाजीपाला लागवडीचे महत्त्व, त्याचे फायदे, आव्हाने शोधू.
उज्ज्वल भविष्याची लागवड: महाराष्ट्रात भाजीपाला शेती
आपल्या आहारात भाजीशिवाय एक दिवसही जात नाही. भाजीपाल्यामधील जीवनसत्त्वे आणि इतर पोषक अन्नघटकांच्या प्रमाणामुळे भाजीपाल्याला सकस आहाराचे महत्त्व प्राप्त झाले आहे. आपल्या देशातील सध्याचे भाजीपाला पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादन हे देशातील लोकसंख्येच्या आवश्यकतेपेक्षा ६० ते ७० टक्के कमी आहे. यावरून आपल्या देशात भाजीपाला पिकांचे लागवडीच्या दृष्टीने महत्त्व लक्षात येते. तसेच वाढत्या लोकसंख्येबरोबरच भाजीपाल्याचा खप आणि उत्पादनवाढीसाठी संधी दरवर्षी वाढत आहेत. निर्यातीच्या सर्वाधिक संधी असलेले भाजीपाल्याची प्रक्रियेसाठी मोठी मागणी आहे. तसेच महाराष्ट्रातील वैशिष्टपूर्ण आणि वैेविध्यपूर्ण भौगोलिक परिस्थिती यामुळे आणि इतर अनेक कारणांमुळे महाराष्ट्रात भाजीपाला लागवडीसाठी उज्ज्वल भविष्य आहे. म्हणूनच महाराष्ट्रात भाजीपाला पिकाचे व्यापारी दृष्ट्या महत्त्व आणि लागवडीस असलेला वाव पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येईल.
हवामान व जमीन विविधता
महाराष्ट्रातील काही भागात उन्हाळ्यातील तापमान ४५ अंश से. पर्यंत असते तर हिवाळ्यातील तापमान १० अंश से. पोहचते. समुद्र किनार्या लगतच्या भागात आर्द्रता जास्त असते. काही ठिकाणी खूप जास्त तर काही ठिकाणी फार कमी पाऊस पडतो. अशीच विविधता महाराष्ट्रात जमिनीच्या बाबतीत आढळते. महाराष्ट्रात काही ठिकाणी माळरान, डोंगरउतार, तर काही ठिकाणी सपाट प्रदेश आहे. तसेच पोयट्याच्या जमिनी, लालसर जमिनी, काळ्या जमिनी, पांढर्या जमिनी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनी निरनिराळ्या फळांच्या वाढीस उपयुक्त आहे. म्हणूनच अशा वेगवेगळ्या जमिनीवर आणि हवामानात वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाला लागवडीस मोठा वाव आहे. अशी महाराष्ट्रातील हवामान आणि जमिनीची विविधता पाहता इतर प्रकारच्या शेती सोबतच शेतकर्यांनी भाजीपाला शेती अवलंबल्यास त्यांना निश्चितच शेतीव्यवसायाचा दर्जा उंचवण्यास मदत होईल.
भाजीपाला पिकांची दरडोई उपलब्धता
आहारशास्त्राननुसार दरमाणसी दररोज ३५० ग्रॅम भाजीपाला ( पालेभाज्या-१२५ ग्रॅम, कंदमुळे-१५० ग्रॅम आणि इतर भाज्या ७५ ग्रॅम) आवश्यक आहे. आपल्या देशाचे १९९१-९२ मध्ये भाजीपाला उत्पादन ५८.५३ दशलक्ष टन इतके हाते, त्यात दुपटीने वाढ होऊन ते सन २००९ -१० मध्ये १३३.७४ दशलक्ष टन इतके झाले आहे. भाजीपाला उत्पादनात जगात चीनचा प्रथम तर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. देशाने एवढी प्रगती गाठली असलीतरी सुद्धा प्रचंड लोकसंख्येमुळे आपल्या राज्यात दरडोई उपलब्धता कमी म्हणजे प्रतिमाणसी २६० ग्रॅम इतकी आहे. विकसित देशात ती ३७० ग्रॅमपेक्षा जास्त आहे. त्यामुळे महाराष्ट्रात भाजीपाला लागवडीचे क्षेत्र व उत्पादन वाढविण्यास खूप वाव आहे.
प्रतिहेक्टरी उत्पन्न जास्त
एक हेक्टर तृणधान्य किंवा कडधान्य किंवा गळीत धान्य यांच्या उत्पादनाशी तुलना करता हमखास ५ ते १० पट जादा उत्पादन भाजीपाला लागवडीतून मिळू शकते. त्यामुळे, आहे त्या क्षेत्रातूनच केवळ भाजीपाला शेतीकडे वळून शेतकर्याला जादा उत्पादन मिळू शकते.
कमी कालावधी, कमी लागवड खर्च आणि वर्षभर लागवड
इतर सर्व पिकांशी जर तुलना केली तर बहुतांश भाजीपाला पिके ही कमी कालावधीत तयार होणारी आहेत. त्यामुळे कमी वेळात शेतकर्यांच्या हातात पैसे उपलब्ध होतात. तसेच शेतकर्यांनी योग्य नियोजन केल्यास वर्षभरात ३ ते ४ पिकांचे उत्पादन घेता येते. त्यामुळे शेतकर्यांना नियमीत पैसा मिळू शकतो. तसेच भाजीपाला लागवडीकरिता फळबाग लागवडीसारखा किंवा नगदी पिकांसारखा अवाढव्य खर्च येत नाही. त्यामुळे कमीतकमी भांडवलात सामान्य शेतकरीही भाजीपाला पिके घेउ शकतो.
हमखास बाजारपेठ
ताजा भाजीपाला आणि प्रक्रिया केलेल्या भाज्यांना नेहमीच वर्षभर मागणी असते. तसेच महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत शाकाहार करणार्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे भाजीपाल्याची मागीण कधीही कमी होत नाही.
कमी पाण्यात भाजीपाला शेती
कमी पाऊस पडणार्या प्रदेशात उपलब्ध असलेल्या पाण्याच्या कमतरतेमुळे किंवा विशिष्ट कालावधीत पाण्याच्या अनुपलब्धतेमुळे त्या विशिष्ट कालावधीत भाजीपाल्याची काही पिके घेता येणे शक्य असते. शेवगा, हादगा, कढीपत्ता अशी पीके कमी पाण्यातही यशस्वीपणे घेता येतात.
भाजीपला लागवडीसाठी पतपुरवठा
भाजीपला लागवडीसाठी आवश्यक असलेल्या निविष्ठा व साधनसामग्रीची खरेदी करण्यासाठी बॅकांनी अल्प व्याजदरात कर्जाची सोय उपलब्ध केली आहे. शासन सुद्धा नवनवीन योजना आणून भाजीपाला शेतीसाठी प्रोत्साहन देत आहे.
आधुनिक सिंचन सुविधा
महाराष्ट्रातील बारमाही, आठमाही आणि हंगामी स्वरूपाच्या ओलिताखालील क्षेत्रात हळूहळू वाढ होत आहे. त्यामुळे ज्या भाजीपाला पिकांना ठराविक काळापुरते पाणी लागते अशा भाजीपाला पिकांची लागवड करण्यास अधिक वाव निर्माण झाला आहे. तसेच आधुनिक सिंचनाच्या नवीन पद्धती जसे ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन यांचा वापर फायद्याचा ठरला आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा जास्तीतजास्त वापर होऊन भाजीपाला शेतीकडेे शेतकर्यांचा कल वाढत आहे.
भाजीपाल्यावर प्रक्रिया
मिरची, भेंडी, वाटाणा, गवार, कांदा, अशा भाज्यांचे निर्जलीकरण करून त्यांची निर्यात करण्यास भरपूर संधी निर्माण झाल्या आहेत. फुलकोबी, वाटाणा हवाबंद करून, मिरचीचे लोणचे, टोमॅटो केचप, ज्यूस असे प्रक्रियायुक्त पदार्थ निर्यात होऊ शकतात. त्यामुळे भाजीपाला प्रक्रिया उद्योगाला लागणार्या कच्च्या मालाची गरज पूर्ण करण्यासाठी खास आवश्यक अशी भाजीपाला लागवड करण्याची संधी निर्माण झाली आहे.
भाजीपाला निर्यात
भेंडीच्या परभणी क्रांती, अर्का अनामिका, वर्षा संकरित, वर्षा उपहार, मिरचीच्या अवसरी, पनवेल, जी-४, पुसा ज्वाला, गवारीची पुसा नवबहार, कांद्याचे ऍग्रीफाउंड डार्क रेड, ऍग्रीफाउंड लाईट रेड, अर्कानिकेतन, बसवंत ७८०आणि एन २-४-१ हे मोठ्या आकाराचे लाल कांदे, ग्रॅनेक्स३३, स्पॅनिश ब्राउन, ताना एफ-१हे पिवळ्या रंगाचे कांदे, ऍग्रीफाउंड रोझ, अर्का बिंदू हे छोट्या आकाराचे गुलाबी कांदे, कलिंगडाची शुगर बेबी, लसणाची ऍग्रीफाउंड पार्वती आणि जी -२८२ या भाजीपाल्याच्या वाणांना परदेशात चांगली मागणी असते. कांदा, बटाटा, टोमॅटो, कोबी आणि वाटाणा या भाजीपाला पिकांची प्रामुख्याने निर्यात ही बांगलादेश, मलेशिया, अरब अमिरात, श्रीलंका, नेपाळ, सिंगापूर, पाकिस्तान, बहारीन, सौदी अरेबिया, मॉरेशस, कुवेत व इराण, यु.ए.ई., युनायटेड किंगडम (इग्लंड, जर्मनी, फ्रांस) या देशांना केली जाते.
भाजीपाला वाहतूक, दळणवळण, साठवणूक सुविधा
महाराष्ट्रात सध्या वाहतुक करण्यासाठी अलीकडच्या काळात दळवळणाच्या अनेक बाबींमध्ये वाढ आणि सुधारणा होत आहे. पक्के आणि चारपदरी रस्ते, मालमोटारी, मालगाड्या, रेल्वेमार्ग इत्यादी वाहतुकीची साधने वाढलेली आहेत. दूरच्या मालवाहतुकीसाठी जलमार्ग आणि हवाईमार्ग अशा सुविधाही विकसित झालेल्या आहेत. टपाल आणि दुरध्वनी या यंत्रणेसाबेतच आता मोबाईल, फॅक्स, इ-मेल, वेबसाईट, व्हिडीओ कॉन्फरन्स इत्यादी आधुनिक दळवळणाच्या सोयी मोठ्या प्रमाणात आणि सर्वांना सहजपणे वापरता येतील अशा पद्धतीने विकसित झालेल्या आहेत. या सुविधांमुळे बाजारपेठेतील उलाढाल, पुरवठा आणि मागणी, भाजीपाल्याची योग्य तेथे वाहतुक यात सुटसुटीतपणा आणि जलदपणा आलेला आहे. शासनाचा कृषि विभाग, कृषी विद्यापीठे आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्याकडून तर आता मोबाईल तसेच इतर माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती सरळपणे शेतकर्यांना दिली जात आहे. या सर्व बाबींमुळे नाशवंत असलेला हा भाजीपाला कमी कालावधीत ग्राहकांपर्यंत पोहचविणे शक्य झाले आहे. तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे भाजीपाल्याची शीतकक्ष साठवणूक सुविधा अनेक भागात विकसित झाली आहे.
रोजगार निर्मिती
भाजीपाला पिके कमी कालावधीची असल्यामुळे वर्षभर लागवड होते. तसेच भाजीपाला व्यवसायात लागवडीपासून ते माल बाजारपेठेत नेण्यासाठी वर्षभर विविध प्रकारच्या मनुष्यबळाची गरज भासते. त्यामुळे जास्तीतजास्त लोकांना रोजगार मिळून बेकारीचे प्रमाण काही अंशी कमी करता येते.
निष्कर्ष
रोजगाराच्या संधी निर्माण करण्यापासून ग्रामीण उत्पन्नाला चालना देण्यापर्यंत महाराष्ट्रात भाजीपाला लागवडीचे फायदे अनेक पटींनी आहेत, त्यामुळे महाराष्ट्र भाजीपाला लागवडीत अग्रेसर म्हणून आपले स्थान आणखी भक्कम करू शकतो आणि आपल्या नागरिकांसाठी आणि संपूर्ण देशासाठी निरोगी आणि समृद्ध भविष्य सुनिश्चित करू शकतो.