महामेष योजना, आशा स्वयंसेविका, दिव्यांग पदोन्नती आरक्षण, नाशिक जिल्ह्यात एमआयडीसी बाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

Decisions in Cabinet meeting July 2024
Cabinet meeting July 2024


जुलै महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आले.

{tocify} $title={Table of Contents}

आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान

आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला असून अपघाती मृत्यू आल्यास दहा लाख आणि अपंगत्वासाठी पाच लाख रुपये अनुदान देण्यात यावे असे जुलै महिन्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यासाठी प्रति वर्षी अंदाजे १ कोटी ५ लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला. हा निर्णय १ एप्रिल २०२४ पासून लागू करण्यात आला आहे. सध्या ७५ हजार ५७८ अशा स्वयंसेविका आणि ३६२२ गटप्रवर्तक कार्यरत असून त्या आरोग्यासंदर्भात महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळतात. हे करताना अपघाती मृत्यू आल्यास किंवा अपंगत्व आल्यास त्यांना आर्थिक सहाय्य व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

राजे यशवंतराव होळकर महामेष योजना

राज्यातील मेंढपाळांसाठी असलेली राजे यशवंतराव होळकर महामेष योजना पुढे सुरू ठेवण्याचा आणि मेंढपाळ लाभार्थींना रक्कम थेट खात्यात जमा करण्याचा निर्णय जुलै महिन्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यातील धनगर समाजातील मागासलेपण दूर करण्याच्या उद्देशाने ही योजना २०१७ वर्षापासून सुरु होती. या योजनेत अधिकाधिक लाभार्थींना फायदा व्हावा म्हणून काही बदलासह त्यास मान्यता देण्यात आली. या वर्षासाठी महामंडळाकडे असलेल्या २९ कोटी ५५ लाख इतका निधी चालू वित्तीय वर्षात खर्च करण्यास आणि त्यानंतर ही योजना दरवर्षी अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार पुढे चालू ठेवण्यात येईल. पशुधन खरेदीच्या बाबतीत ७५ टक्के अनुदानाची रक्कम ७ दिवसात थेट लाभ हस्तांतरण प्रक्रीयेतून (डीबीटी) लाभार्थीना देण्यात येईल. तसेच चारा बियाणे व बहुवार्षिक गवत प्रजातीचे ठोंबे व बियाणे यासाठीचे अनुदान वगळता उर्वरित सर्व लाभ डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थींना देण्यात येतील.

दिव्यांग कर्मचार्‍यांना २०१६ पासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू

राज्य शासनातील दिव्यांग कर्मचार्‍यांसाठी ३० जून २०१६ पासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. गट ड ते गट अ च्या पदांमध्ये पदोन्नतीमध्ये ४ टक्के आरक्षण ३० जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात येत आहे. याचा लाभ काल्पनिक पद्धतीने गट अ च्या निम्न स्तरापर्यंत मिळेल. ३० जून २०१६ पासून ज्या दिनांकाला दिव्यांग अधिकारी किंवा कर्मचारी पदोन्नतीसाठी पात्र ठरेल त्या दिनांकापासून त्यांना काल्पनिकरित्या आरक्षणाचा लाभ देण्यात येईल. पदोन्नतीचा प्रत्यक्ष आर्थिक लाभ त्यांना प्रत्यक्षात पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून लागू होईल. या निर्णयामुळे पदोन्नती साखळीतील अंतर्गत ज्येष्ठतेवर परिणाम होण्याच्या शक्यतेमुळे गैरसोय टाळण्यासाठी ३० जून २०१६ नंतर मान्यता देण्यात आलेल्या प्रत्येक निवडसूचीतील पद संख्येनुसार आणि २० एप्रिल २०२३ च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार प्रत्येक शासकीय आस्थापनेने दिव्यांग आरक्षणाची गणना करावी. तसेच पात्र दिव्यांगांची संख्या पुरशी नुसल्यास अधिसंख्य पद निर्माण करावे असे देखील ठरले.

शेती पिकांचे नुकसान ठरविण्यासाठी अद्ययावत प्रणाली

शेती पिकांचे नुकसान ठरविण्यासाठी लवकरात लवकर अद्ययावत प्रणाली विकसित करावी जेणेकरून ही नुकसान भरपाई अधिक पारदर्शकतेने व अचूकपणे देता यावी असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ही प्रणाली सुरु होईपर्यंत प्रचलित पद्धतीने नुकसान भरपाईची मदत देण्यात येईल. १ जुलै २०२४ रोजी यासंदर्भात झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत सामान्यकृत फरक वनस्पती निर्देशांक (एनडीव्हीआय) निकषासाठी पूर्ण अद्ययावत प्रणाली कृषी विभागामार्फत तयार होत नाही तोपर्यंत प्रचलित धोरणांप्रमाणे शेती पिकांना नुकसान भरपाई देण्याबाबत निर्णय झाला होता.

बृहन्मुंबईमध्ये न्यायिक अधिकार्‍यांसाठी ५१ सदनिका

बृहन्मुंबईमध्ये न्यायिक अधिकार्‍यांसाठी ५१ सदनिका भाडे तत्वावर उपलब्ध करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. माझगाव येथील पारिजात इमारतीत १६, केदार इमारतीतील ३ अशा १९ न्यायिक अधिकार्‍यांना आणि नव्याने निर्माण झालेल्या पदांच्या अनुषंगाने ३२ अशा ५१ सदनिका ऑक्टोबर २०२४ ते ऑक्टोबर २०२७ या तीन वर्षाच्या कालावधीसाठी भाडेतत्वावर घेण्यात येतील. एका सदनिकेचे १ महिन्याचे कमाल भाडे १ लाख २० हजार असून त्यामुळे ५१ सदनिकेसाठी एका वर्षाच्या ७ कोटी ३४ लाख ४० हजार इतक्या भाडे खर्चास मान्यता देण्यात आली.

नाशिक जिल्ह्यातील अंबडमध्ये एमआयडीसीसाठी १६ हेक्टर शासकीय जमीन

नाशिक जिल्ह्यातील मौ.अंबड येथे एमआयडीसीला विस्तारीकरणासाठी १६ हेक्टर शासकीय जमीन विनामुल्य दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या जमिनीची किंमत २४ कोटी २ लाख ४० हजार इतकी असून ती विनामुल्य एमआयडीसीला हस्तांतरीत करण्यात येईल.

राज्यात सरासरीच्या १२३ टक्के पाऊस

राज्यात सरासरीच्या १२३.२ टक्के पाऊस झाला असून पेरण्या देखील समाधानकारक झाल्या आहेत. या संदर्भातील सादरीकरण आज कृषी विभागाने मंत्रिमंडळ बैठकीत केले. राज्यात २२ जुलै पर्यंत ५४५ मि.मी. पाऊस झाला आहे. मागील वर्षी याच सुमारास ४२२ मि.मी. म्हणजेच सरासरीच्या ९५.४ टक्के पाऊस झाला होता. राज्यात खरीपाचे ऊस वगळून १४२.२ लाख हेक्टर क्षेत्र असून आतापर्यंत १२८.९४ लाख हेक्टर क्षेत्रावर (९१ टक्के) पेरणी झाली आहे. भात व नाचणी पिकाची पुर्नलागवड कामे सुरु असून ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन, तूर, उडीद, मूग, भुईमूग आणि कापसाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत. खत आणि बियाणांची पुरेशी उपलब्धता आहे.

राज्यातील पाणी साठा

सध्या राज्यातील सर्व धरणांमध्ये ३९.१७ टक्के पाणी साठा असून गेल्या वर्षी याच सुमारास ४३.६५ टक्के पाणी साठा होता. सर्वात कमी म्हणजे १२.१३ टक्के पाणी साठा छत्रपती संभाजीनगर येथे तसेच २८.३४ टक्के नाशिक येथे आहे. राज्यातील १ हजार २१ गावे आणि २ हजार ५१८ वाड्यांना १ हजार ३६५ टँकर्सद्धारे पाणीपुरवठा सुरु आहे. टँकर्सची संख्या ३२६ ने वाढली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

तुमच्या टिप्पण्या (comments ) आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत! कृपया आपले मत आणि प्रश्न येथे मांडा. आम्ही प्रत्येक टिप्पणी वाचतो आणि तुमच्या अभिप्रायाचे स्वागत करतो. आदरयुक्त आणि सकारात्मक सवांद राखण्यासाठी सर्व टिप्पण्या तपासूनच प्रकाशित होतात.

थोडे नवीन जरा जुने

{Ads}


इतके स्वस्त कपडे कधीच नव्हते, amazon वर आताच विकत घ्या

{Ads}

.
amazon वर एकदा चेक तर करा
सर्व आपल्या बजेटमध्येच आहे,
Watches- Men     Women
Footwear- Men      Women
.


.
amazon वर आज कोणत्या ऑफर्स
.