![]() |
International Cancer Day |
कर्करोगावर गप्पा मारायला सहसा कुणालाही आवडत नाही. त्यामुळे कर्करोगाविषयी अनेक गैरसमज लोकांमध्ये पसरलेले आहेत. असे गैरसमज नष्ट करण्यासाठी, तसेच कर्करोगाविषयी म्हणजे तो कसा होता, त्या कसे ओळखावे, त्याचे प्रकार आणि अवस्था कोणत्या आणि त्यावरील उपचाराचे टप्पे कोणते याविषयी संपूर्ण माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी दिनांक ४ फेब्रुवारीला कर्करोग दिन साजरा करणे हे उत्तम व्यासपीठ आहे.
{tocify} $title={Table of Contents}
सुमारे १.४ अब्ज लोकसंख्या असलेल्या भारताला अनेक गंभीर आजारांशी झगडावे लागते आणि दरवर्षी ६.५ लाख लोकांचे बळी घेणार्या कर्करोगाचा त्यात वरचा क्रमांक लागतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार पुढील १० वर्षात उपचाराचे प्रयत्न न केले गेल्यास ८ कोटी ९० लाख लोक कर्करोगामुळे मृत्युमुखी पडतील. म्हणूनच या रोगाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी ४ फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी जागतिक कर्करोग दिन म्हणून पाळला जातो.
कर्करोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी साजरा करा - जागतिक कर्करोग दिन
भारतात २.९ दशलक्ष लोकांना कर्करोगाची लागण झाली असल्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे दरवर्षी त्यात ८ लाख नवीन रूग्णांची भर पडत आहे. कर्करोगाचे उपचार करण्यासाठी आलेल्या ७० टक्के रूग्णांमध्येे कर्करोग प्रगत अवस्थेत असतो, त्यामुळे उपचार करूनही खूप कमी लोक वाचतात. कर्करोग कशामुळे होतो, तो कसा ओळखावा आणि त्यावर उपचार कसे घ्यावे याबाबत जनजागृती होण्यासाठी दरवर्षी ४ फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिन पाळला जातो. खरे तर जागतिक कर्करोग दिन म्हणजे कर्करोग कसा रोखता येईल, त्याचे निदान आणि त्याचा उपचार याविषयी जागृती करण्याचा एक जागतिक उपक्रम आहे. जगातील कर्करोगाच्या प्रसाराला विरोध करण्यासाठी संपूर्ण जगाला एकजुटीने काम करण्यासाठी प्रोत्साहन देणारा हा एक कार्यक्रम आहे.
कर्करोगाची कारणे
तसे पाहिले तर बर्याच लोकांसाठी कर्करोग होण्याचे कारण पर्यावरणात्मक आणि जीवनशैलीशी निगडीत आहे. तंबाखू, दारूचे सेवन, रोग संसर्ग, आहार आणि वर्तणुकीत्मक घटक हे कर्करोगाशी जोखीम वाढविणारे सर्वात महत्त्वाचे घटक आहेत. कर्करोग झालेल्या पुरूषांपैकी ५० टक्के पुरूषांना धूम्रपान किंवा चघळणार्या तंबाखूचे सेवन हे प्रमुख कारण असते. २० ते ३० टक्के कर्करोग्यांमध्ये आहार सवयी, पुनरूत्मादन निगडीत आणि लैंगिक सवयी ही रोगांची कारणे असतात. दैनंदिन व्यायामाचा अभाव, प्रदूूषणात झालेली बेसुमार वाढ, खाण्यापिण्याच्या सवयीत होणारे बदल आणि त्यासोबत ताण, तणाव आणि चिंता, आहारात पोषक तत्त्वांचा अभाव, निरोगी जीवनाशी झालेली फारकत, उशिरा लग्न याबाबींही कर्करोगाला कारणीभूत ठरू शकतात, असे संशोधकांचे म्हणणे आहे. तसेच पुरूषांमध्ये फुफ्फुस, मान, घसा आणि प्रोटेस्ट ग्रंथीच्या कर्करोगाला बळी पडण्याचे प्रमाण अधिक असते तर महिलांमध्ये सर्वसाधारणपणे स्तन आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे.
कर्करोग टाळण्यासाठी
पुरूष आणि स्त्रियांनी कोणत्याही प्रकारच्या तंबाखूचे सेवन टाळले पाहिजे. तसेच तंबाखूचे सेवन टाळणार्यांनी इतर लोक जेव्हा धुम्रपान करतात, अशा धुरापासूनही दूर रहायला हवे. दारूचे सेवनानेही कर्करोग होतो, तेव्हा दारू पासूनही दूरच रहायला हवे. रोजच्या आहारात पौष्टीक अन्नासोबत ताजी फळे आणि भाजीपाला यांचा समावेश करायला हवा. चरबीयुक्त आहार, अती तिखट आणि मसालेयुक्त आहार यांचे प्रमाणही कमी करायला हवे. सूर्यप्रकाशात जास्त वेळ राहणे हे त्वचेच्या कर्करोगाचे प्रमुख कारण आहे. सूयाचे अतिनील किरण, खासकरून सकाळी १० ते ४ वाजेपर्यंंत अंगावर अधिक वेळ उन पडणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. काविळ संबधी लसी वेळेवर द्यायला हव्या. कारण काविळात योग्य उपचार न केल्यास पुढे यकृताचा कर्करोग होऊ शकतो. तसेच जीवाणू संसर्ग, हेपॅटायटिस बी आणि एचआयव्ही यासारख्या लेैंगिक संबंधाच्या माध्यमातून विविध प्रकारचे कर्करोग होण्याची शक्यता वाढते. म्हणून दुषित अन्न आणि पाणी पिण्याचे कटाक्षाने टाळले पाहिजे. तसेच सुरक्षित लैगिंक संबधच पाळले पाहिजे. दवाखान्यात उपचार करतांना, रक्तदान करतांना प्रत्येकवेळी नवीन आणि निर्जंतुक सुयाच वापरल्या पाहिजेत.
स्वत:चा कर्करोग स्वत:च ओळखणे
कर्करोगाची थोडी जरी शंका असल्यास लगेच तपासणी करायला हवी. स्वत:चा कर्करोग स्वत:च ओळखण्यासाठी पुढील लक्षणांचा गांभीर्याने विचार करायला हवा. अचानक वजन कमी होणे, सतत ताप येणे, सारखी बैचैनी वाटणे, सतत डोके दुखणे, संडास आणि लघवीच्या सवयीत बदल होणे, बरा होत नाही असा व्रण असणे, अतिरिक्त रक्त स्त्राव किंवा अंगावर जाणे, स्तनांमध्ये, वृषणामध्ये किंवा इतरत्र मांसाचा गोळा जाणवणे, अपचन किंवा गिळण्यास त्रास होणे. चामखीळ, तीळ किंवा मुखातील व्रण यांच्या आकारमानात, रंगात, आकारात किंवा जाडीत उघड बदल होणे. वारंवार खोकला होणे, आवाज घोगरा होणे. तसेच अचानक दिर्घकाळ येणारा थकवा, थुंकीतून रक्त जाणे, आवाजातील बदल ही सुद्धा कर्करोगासंबधी लक्षणे असू शकतात.
कॅन्सरच्या चाचण्या आणि उपचार:-
विविध तपासण्या करून कॅन्सरचे निदान करता येते. या तपासण्यांमध्ये हिमोग्रॅम, मल-मुत्र तपासणी, छातीचा एक्स-रे. सोनोग्राफी, पॅप स्मिअर, मॅमोग्राफी तपासण्यांचा समावेश आहे. आता तर अत्याधुनिक सीटी स्कॅन मशिन उपलब्ध झाले असून या मशिनद्वारे संपूर्ण शरीराची तपासणी केली जाऊन कोणत्याही भागतील कॅन्सरचे निदान त्वरीत केले जाऊ शकते. निदान झाल्यानंतर उपचारासाठी सर्जरी, रेडीएशन थेरपी आणि किमोथेरपी अशा पद्धतींचा अवलंब केला जातो.
कॅन्सर म्हणजे कॅन्सल आता असे नव्हे
कर्करोगाविषयी सामान्य जनतेत प्रचंड भिती आहे. कॅन्सरवर उपचारच नाहीत, ही भावनाअसल्यामुळे कॅन्सरचे निदान झाल्यावर रुग्ण लगेच अर्धमेला होतो. तसेच आपल्या शरीराचा कुठला भाग कॅन्सरने व्यापला आहे, याविषयी रूग्ण कुणाशीही चर्चा करीत नाही. विशेषत: महिला वर्ग आपल्याला जडलेल्या आजाराविषयी वाच्यता करीत नाहीत. शरीराला पूर्णपणे व्यापल्यानंतर रूग्ण डॉक्टरकडे जातो. परंतु तेव्हा खूप उशिर झालेला असतो. म्हणूनच कॅन्सर म्हणजे कॅन्सल असा गैरसमज कॅन्सरच्या रूग्णांमध्ये पसरलेला आहे. परंतु प्राथमिक अवस्थेत असलेला कर्करोग आधुनिक उपचार पद्धतींमुळे पूर्णपणे बरा होऊ शकतो.
प्रत्यक्षात कॅन्सर म्हणजे एक रोग नाही. शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढींमुळे उद्भवणारी ही एक अवस्था आहे. सध्या दोनशेहून अधिक कॅन्सर ठावूक आहेत. कॅन्सर कोणत्याही पेशींमध्ये, कोणत्याही उतींमध्ये आणि अवयवांमध्ये होऊ शकतो. सर्व कॅन्सरमधील समान दुवा म्हणजे अनियत्रिंत पेशींची वाढ. अशा कर्करोगावर सरकारने प्रतिबंध करण्यासाठी कडक कायद्याची अंमलबजावणी न केल्यास एक दिवस संपूर्ण भारत कर्करोगाला बळी पडू शकतो. कर्करागासंबधी सद्याच्या उपलब्ध असलेल्या आकडेवारीलाच झोक्याची घंटा समजून कर्करोगाच विळखा आणखी घट्ट होण्याआधीच सावरणे गरजेचे आहे. जगण्याविषयी सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करणेे आणि आपली जीवन शैली निरामयतेला जोपासणे हा कर्करोगग्रस्त रूग्णांवर उपचार उपचार करतांना फार महत्त्वाचा मुद्दा आहे.
निष्कर्ष
एखाद्या व्यक्तीला कर्करोगाचे निदान झाल्यास त्याला मानसिक धक्का पोहचू नये म्हणूनही कर्करोगावर कुणीही चर्चा करत नाही. त्यामुळे कर्करोगाविषयी अनेक गैरसमज लोकांमध्ये पसरलेले आहेत. असे गैरसमज नष्ट करण्यासाठी, तसेच कर्करोगाविषयी म्हणजे तो कसा होता, त्या कसे ओळखावे, त्याचे प्रकार आणि अवस्था कोणत्या आणि त्यावरील उपचाराचे टप्पे कोणते याविषयी संपूर्ण माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी दिनांक ४ फेब्रुवारीला कर्करोग दिन साजरा करणे हे उत्तम व्यासपीठ आहे. असा दिन प्रत्येक गावात, शाळा-महाविद्यालयात, सरकारी आणि खाजगी कार्यालयांमध्ये साजरा झाल्यास आणि प्रसार माध्यमांनी त्याला उत्तम प्रसिद्धी दिल्यास जागतिक आरोग्य संघटनेच्या अनुमानानुसार येत्या काही वर्षात आपण निश्चितच कर्करोगाच्या रूग्णांमध्ये २५ टक्के घट निर्माण करू शकू.