महाराष्ट्र विधानसभा निवडणुक- २०२४: एकाच टप्प्यात होणार मतदान

Maharashtra Assembly Election-2024
Maharashtra Assembly Election-2024

निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर, २०२४ रोजी पत्रकार परिषद घेत निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार असून २० नोव्हेंबर रोजी मतदान तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. अशी घोषणा निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांकडून जागावाटप, निश्‍चित उमेदवारांची नावे आदी कामे सुरू झालीत. ज्या मतदार संघात अजुनही वाद आहे, तेथे कोणाला उमेदवारी मिळते; याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.

२६ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपत आहे. या पार्श्‍वभूमीवर गेल्या महिन्यात निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांनी महाराष्ट्राचा दौरा करुन परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्यावेळी राज्यात २६ नोव्हेंबरपूर्वी निवडणूक घेण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर केली. महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी मतदान तर मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी होणार असल्याने २६ नोव्हेंबरच्या आधी नवीन विधानसभा अस्तित्वात येणार आहे. लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रात पाच टप्प्यांत घेण्यात आली होती. पण, विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक :

  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख - २९ ऑक्टोबर २०२४ (मंगळवार)
  • अर्ज पडताळणीची तारीख - ३० ऑक्टोबर २०२४ (बुधवार)
  • अर्ज परत घेण्याची शेवटची तारीख - ४ नोव्हेंबर २०२४(सोमवार)
  • मतदानाचा दिवस - २० नोव्हेंबर २०२४
  • मतमोजणीची तारीख - २३ नोव्हेंबर २०२४

अनेकांना शंका होती की निवडणूक आयोग जम्मू काश्मीरमध्ये निवडणूक घेऊ शकेल की नाही? पण निवडणूक आयोगाने यशस्वीपणे या निवडणुका घेऊन दाखवल्या. जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या निवडणुकीत हिंसाचाराची एकही घटना घडली नाही. विधानसभेची मुदत ४ जानेवारी २०२५ रोजी संपत असलेल्या झारखंडमध्ये १३ आणि २० नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. लोकसभेची निवडणूक झारखंडमध्ये तीन टप्प्यात घेण्यात आली होती. झारखंडमध्ये ८१ जागा असून, तेथे दोन टप्प्यांत निवडणूक आणि २८८ जागा असलेल्या महाराष्ट्रात एका टप्प्यात निवडणूक घेतली जाणार आहे. दुसरीकडे, झारखंड विधानसभेची मुदत जानेवारीत संपत असताना पहिला टप्पा महाराष्ट्राच्या आधी १३ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे, तर दुसरा टप्पा महाराष्ट्राबरोबर २० नोव्हेंबर रोजी होणार आहे. हा एक विरोधाभास दिसून येत आहे. यावर अनेक पॉलीटीकल पंडितांनी वेगवेगळी मते दिली आहेत. अर्थात, निवडणूक आयोग सर्व गोष्टींचा विचार करुन तारखा ठरवत असतो.

निवडणूक आयोग निष्पक्ष असला, तरी त्याच्यावर पक्षपातीपणाचे आरोप देशातील विरोधी पक्षांनी आतापर्यंत केले आहेत. आयोगाने सर्व आरोप फेटाळून लावले असले, तरी काही स्वयंसेवी संस्थांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन आयोगाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. न्यायालयानेही आयोगाला काही बाबतीत सूचना केल्या. राज्यातील सत्ताधारी महायुतीला आपला राजकीय कार्यक्रम राबविण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून निवडणुका लांबणीवर टाकल्या जात असल्याचा आरोप विरोधकांनी हरियाणा आणि केंद्रशासित जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा केला होता. महाराष्ट्रात निवडणूक लांबल्याचा पुरेपूर फायदा राज्यातील सत्ताधारी महायुतीने घेतला. हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर महायुतीने राज्यात मंत्रिमंडळाच्या बैठका घेऊन शेकडो निर्णय घेतले. दुसरीकडे सरकारी योजनांची प्रचंड जाहिरातबाजी केली. विविध विकास कामांची उद्घाटने आणि भूमिपूजने उरकून घेतली. अगदी शेवटच्या क्षणी विधान परिषदेवर सात राज्यपाल नियुक्त सात सदस्यांची नियुक्तीही करवून घेतली.

आचारसंहिता लागू झाल्याने सरकारला आता कोणताही नवीन घेता येणार नाही आणि जाहिरातबाजीही करता येणार नाही. हरियाणा विधानसभा पोलवाल्यांचा अंदाज चुकला आणि राजकीय निरीक्षकांनाही धक्का बसला. हरियाणात भाजपाने नकारात्मक लाटेवर मात केली, तशीच मात महाराष्ट्र करण्यात यशस्वी होण्याचा विश्‍वास भाजपा आणि महायुतीला वाटत आहे. हरियाणात लागलेल्या निकालाचा धसका घेऊन कॉंग्रेस आणि महाविकास आघाडी सावध झाली आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीवर मात करणार्‍या महाविकास आघाडीमध्ये अत्यंत विश्‍वासाचे वातावरण होते. या वातावरणात बदल करण्यासाठी महायुतीने लाडकी बहीण योजनेसह अनेक योजनांची पेरणी अर्थसंकल्पात केली. या योजनांचा लाभ काही प्रमाणात महायुतीला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन रणनीती महाविकासला आखावी लागणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत असली, तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, बहुजन समाज पार्टी इत्यादी पक्ष स्वबळावर निवडणूक लढविणार आहेत. ते निकालावर परिणाम करू शकतात. याशिवाय स्वराज्य पक्ष (छत्रपती संभाजीराजे भोसले) आ. बच्चू कडू (प्रहार संघटना) यांनी स्थापन केलेली तिसरी आघाडीही परिणाम करू शकते. याशिवाय मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करणारे मनोज जरांगे यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. महाविकास आणि महायुतीत काही लहान पक्ष आहेत. या पक्षांना न्याय्य जागा न मिळाल्यास ते वेगळी भूमिका घेऊ शकतात.

महाराष्ट्रातल्या प्रमुख राजकीय पक्षांची नाव

कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस - शरद पवार गट आणि अजित पवार गट, शिवसेना- एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गट, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन विकास आघाडी, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, प्रहार शेतकरी कामगार पक्ष, जनसुराज्य पक्ष, शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, भारिप, भारत राष्ट्र समिती

ही निवडणूक राज्याची असली, तरी राष्ट्रीय राष्ट्रीय नेत्यांची लोकप्रियता पणाला लागणार आहे. यामध्ये भाजपाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार यांचा प्रामुख्याने समावेश आहे. राज्याचा विचार केला, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर, बच्चू कडू, संभाजीराजे भोसले, मनोज जरांगे यांच्या लोकप्रियतेचा कस लागणार आहे.

महाराष्ट्रातल्या एकूण मतदारांच्या आकडेवारीचा विचार केला तर महाराष्ट्रात ९.६३ कोटी मतदार आहेत, त्यापैकी ४.९७ कोटी पुरुष मतदार आहेत. तर ४.६६ कोटी महिला मतदार आहेत. तरुण मतदारांची संख्या १ कोटी ८५ लाख म्हणजे जवळपास २० टक्के आहे. तर पहिल्यांदाच मतदान करणार्‍यांची संख्या २० लाख ९३ हजार आहे. हे सर्व मतदार नवीन सरकार निवडणार आहेत. महाराष्ट्रात एकूण १ लाख १८६ मतदान केंद्र आहेत. यात शहरांमध्ये ४२ हजार ६०४ तर ग्रामीण भागात ५७ हजार ५८२ मतदान केंद्र आहेत.

महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागा असून युती किंवा आघाडीला सरकार स्थापन करण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असेल. याशिवाय या विधानसभेसोबत लोकसभेच्या २ जागांवर पोटनिवडणूकही होणार आहे. केरळच्या वायनाड या लोकसभा मतदारसंघात १३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर महाराष्ट्रातील नांदेड लोकसभा मतदारसंघात २० नोव्हेंबरला मतदान घेण्यात येईल. या दोन्ही पोटनिवडणुकांचे निकाल हे विधानसभेच्या निकालासोबतच म्हणजेच २३ नोव्हेंबर २०२४ रोजी जाहीर केले जातील.

राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन प्रमुख प्रादेशिक पक्षांमध्ये पडलेल्या फुटीनंतर होत असलेली ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. तसंच महायुती आणि महाविकास आघाडी या नावांनी तयारी झालेल्या नव्या राजकीय समीकरणांचाही या निवडणुकीत कस लागणार आहे. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक चांगलीच रंगतदार ठरणार असून यामध्ये कोण बाजी मारणार, याबाबत देशभरात उत्सुकता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

तुमच्या टिप्पण्या (comments ) आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत! कृपया आपले मत आणि प्रश्न येथे मांडा. आम्ही प्रत्येक टिप्पणी वाचतो आणि तुमच्या अभिप्रायाचे स्वागत करतो. आदरयुक्त आणि सकारात्मक सवांद राखण्यासाठी सर्व टिप्पण्या तपासूनच प्रकाशित होतात.

थोडे नवीन जरा जुने

{Ads}


इतके स्वस्त कपडे कधीच नव्हते, amazon वर आताच विकत घ्या

{Ads}

.
amazon वर एकदा चेक तर करा
सर्व आपल्या बजेटमध्येच आहे,
Watches- Men     Women
Footwear- Men      Women
.


.
amazon वर आज कोणत्या ऑफर्स
.