विमान सेवेत अफवांची उडाण - बनावट कॉलमुळे करोडोंचे नुकसान

Rumors fly in airline service
Rumors fly in airline service - loss of crores due to fake calls


देशात विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या मिळण्याचे सत्र सुरू आहे. अनेकदा विमानांना उड्डाण करण्यापूर्वी अथवा उड्डाण केल्यानंतर लगेचच या धमक्या प्राप्त होतात. यामुळे अनेकदा विमानांचे आपत्कालीन लँडिंग करावे लागते आणि पुढे सर्व सुरक्षा नियम पाळून तपासणी केली जाते. यात प्रवाशांचा, विमान कंपन्यांचा वेळ आणि पैसा दोन्हींचे नुकसान होत असल्याचे समोर येत आहे. तपसाअंती या धमक्या बनावट असल्याचे निष्पन्न होत आहे. मात्र, यात विमान कंपन्यांना एका धमकीच्या मागे करोडो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत असल्याची आकडेवारी समोर आली आहे.

देशाच्या विमान सेवेवर आघात करणार्‍या घटना गेल्या आठवडाभरापासून घडताहेत. एअर इंडिया, इंडिगो, आकासा एअर, विस्तारा, स्पाइसजेट, स्टार एअर आणि अलायन्स एअरच्या ३० हून अधिक देशांतर्गत आणि परदेशी विमानांना सोशल मीडिया पोस्टद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. मात्र, या सर्व धमक्या म्हणजे अफवा ठरल्या आहेत. मागील आठ दिवसांत ९० हून अधिक विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या मिळाल्याने या विमानाचे उड्डाण रखडले. परिणामी, हजारो प्रवाशांचा खोळंबा होवून अनेक उत्पादक तास वाया गेले. या धमक्यांमुळे सुमारे २०० कोटी रुपयांचे नुकसान झाले.

बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली तेव्हा काही विमाने हवेत होती, काही नुकतीच धावपट्टीवर उतरली होती, तर काही उड्डाण करण्याच्या बेतात होती. या धमक्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली असली तरी कुठेही बॉम्ब आढळला नाही. त्यामुळे या अफवाच असल्याचे समोर आले. चिंतेची बाब म्हणजे अफवा नेमकी कोण पसरवतोय, हे देखील अद्याप समजू शकलेले नाही. त्यामुळे विमान वाहतूक क्षेत्रात गोंधळ उडाला आहे.

देशात विमानाने प्रवास करणार्‍या लोकांची संख्या मोठी आहे. दरवर्षी सुमारे पंधरा कोटी नागरिक विमानप्रवास करतात. देशातील विविध विमानतळांवर दररोज तीन हजार विमानांचे उड्डाण होते. मात्र, गेल्या आठवडाभरापासून बॉम्बच्या धमक्यांचे सत्र सुरु आहे. गेल्या आठ दिवसांत ९० हून अधिक विमानांना अशा धमक्या मिळाल्यामुळे सुमारे २० हजार प्रवासी वेठीस धरले गेले.

या प्रकरणी मुंबई पोलिसांनी गत बुधवारी छत्तीसगडच्या एका मुलाला ताब्यात घेतले. त्याने मित्राशी झालेल्या भांडणाच्या रागातून ’एक्स’ या सोशल मीडिया प्लेटफॉर्मवर या धमक्या प्रसारित केल्याचे चौकशीत समजले. मात्र, त्याला ताब्यात घेतल्यानंतरही धमक्या थांबलेल्या नाहीत. त्यानंतर ’एक्स’वर इतर नावाने असलेल्या खात्यावरून काही धमक्या आल्या. हे खाते एक्सने गेल्या शनिवारी बंद केले आणि तरीही, रविवारी आणखी काही विमानांना अन्य स्त्रोतांतून धमक्या आल्या. धमक्या पोकळच म्हणजे खोट्याच ठरल्या तरी, धमकी आल्यावर नियमानुसार राबवावी लागणारी सर्व प्रक्रिया विमान वाहतूक सेवेवर मोठा परिणाम करणारी ठरते.

उडत्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्यास विमानतळावर बॉम्ब धोका मूल्यमापन समितीची तातडीची बैठक होते. धमकी कोठून आली, याची माहिती घेऊन जवळच्या विमानतळावर विमान उतरवण्याच्या सूचना देण्यात येतात. त्यापायी हवाई नियंत्रण कक्षाला संदेश, धावपट्टीवर जागा करून देणे, ही प्रक्रिया राबवावी लागते. इतर विमानांची उड्डाणे थांबवावी लागल्याने प्रवाशांची गैरसोय तर होतेच; पण ज्या विमानाला धमकी मिळाली त्यातील प्रवाशांची, त्यांच्या सामानाची आणि विमानाच्या कानाकोपर्‍याची झडती होते. या प्रवाशांना या काळात जेवणाखाण्यासह इतर सुविधा देण्याची जबाबदारी विमान कंपनीला पार पाडावी लागते. दरम्यानच्या काळात विमानातील कर्मचार्‍यांची कामाची वेळ संपली, तर नवा कर्मचारी वर्ग आणण्याचीही कसरत करावी लागते. हे सर्व सोपस्कार गत आठवडाभरात ९० विमानांच्या बाबतीत पार पाडावे लागले, यावरुन खर्च होणारा वेळ आणि पैसा याची व्याप्ती लक्षात यावी.

विशिष्ट ठिकाणी जाणारे विमान, बॉम्बच्या धमकीमुळे दुसर्‍याच उतरवायचे म्हटले म्हणजे आपत्कालीन लँडिंग करावयाचे झाल्यास तर १०० टन इंधन वाया घालवणे होय. या इंधनाची किमत एक लाख रुपये प्रती टन असते. म्हणजे इंधनासाठीच १ कोटी रुपये वाया घालवणे होय. बोईंग विमानाचे लँडिंग वजन २५० टन असते. यात प्रवासी, सामान, कार्गोसह हे वजन ३४० ते ३५० टन इतके होते. दिल्ली विमानतळावर विमान उतरवण्यासाठी लँडिंग आणि पार्किंग शुल्क तसेच अन्य खर्च, दिल्लीमधील हॉटेलमध्ये २००हून अधिक प्रवाशांना आणि क्रू मेंबर्सना थांबवणे. त्यानंतर नुकसान भरपाई आदी खर्च येतो.

इमर्जन्सी लँडिंगमुळे इतर खर्चही विमान कंपनीच्या खात्यावरचं येतो. जसे की, विमानतळावर आपत्कालीन लँडिंग आणि विमान पार्किंग शुल्क, हॉटेल्समध्ये प्रवासी आणि क्रू यांना ठेवण्याचा खर्च, कोणा प्रवाशांची पुढे कनेक्टिंग फ्लाइट असल्यास त्यांना नुकसान भरपाई देणे, प्रवाशांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था करणे असे अनेक खर्च कंपनीला करावे लागतात. त्यामुळे एका धमकीच्या संदेशामुळे विमान कंपनीला साधारण तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करावा लागतो. गेल्या काही दिवसांत, भारतीय विमान कंपन्यांना वारंवार धमकीचे संदेश मिळत आहेत. परंतु, नंतर हे सर्व खोटे असल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र, या खोट्या धमक्यांमुळे सुमारे ६० ते ७० कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च विमान कंपन्यांना झाला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालय बॉम्बच्या खोट्या धमकीच्या घटना रोखण्यासाठी कठोर नियम लागू करण्याचा विचार करत आहे.बॉम्बच्या धमकीनंतर इमरजेंसी लँडिंगनंतर संपूर्ण तपासणी आणि विमान पुन्हा सेवेत आणण्यासाठी ऑपरेटिंग क्रूची नवी व्यवस्था करावी लागते. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑपरेटिंग क्रू विमान न्यूयॉर्क विमानतळापर्यंत पोहोचेपर्यंत प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. एका बनावट कॉलमुळे विमान कंपनीला ३ कोटी रुपयांहून अधिकचे नुकसान होते.

विमानांना धमक्या मिळणे नवीन नाही. गेल्या जूनमध्ये एकाच दिवसात ४१ विमानांना ई-मेलद्वारे बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या आल्या होत्या, तर २०१४ ते २०१७ दरम्यान अशा १२० धमक्या आल्या, त्यापैकी निम्म्या मुंबई आणि दिल्ली या दोनच विमानतळांना होत्या हे विशेष. यातील चिंतेची बाब अशी की, अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असूनही धमकीचे संदेश कोण पाठवते आहे, याचा छडा तपास यंत्रणांना लावता आलेला नाही. नुसत्या अफवा पेरून भारताची विमान वाहतूक व्यवस्था कोलमडविण्याचा कट असल्याचा कारस्थान सिद्धान्त आता मांडला जात असला, तरी त्याने काही मूळ प्रश्न सुटत नाही. धमक्या देणार्‍यांना विमान प्रवासास बंदी घालण्याचा आणि दंडासह कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्याचा मनोदय विमान वाहतूकमंत्री के. राममोहन नायडू यांनी आता बोलून दाखवला आहे. पण त्यासाठी आधी धमक्या देणारा पकडला तर जायला हवा. कुणी तरी गंमत म्हणून किंवा व्यक्तिगत सूडभावनेने हे करत असेल, तरी तो आपल्या यंत्रणांना सलग सात दिवस गुंगारा देण्यात यशस्वी झाला आहे, हे एकूणच विमान वाहतूक क्षेत्रासाठी फार काही चांगले लक्षण नाही. या धमक्यांचा परिणाम म्हणून केंद्राने डीजीसीए प्रमुख विक्रम देव दत्त यांना पदावरुन हटवून त्यांना कोळसा मंत्रालयाच्या सचिवपदी नियुक्त केले. नागरी विमान उड्डाण सुरक्षा संस्थेचे महासंचालक झुल्फीकार हसन यांनी भारतीय हवाई क्षेत्र पुर्णपणे सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला आहे.

गेल्या काही दिवसात अनेक विमान कंपन्यांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्यानंतर गृह मंत्रालयाने बुधवारी नागरी उड्डयन मंत्रालयाकडून अहवाल मागवला आहे. गेल्या काही दिवसांत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर विविध विमान कंपन्यांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. त्या सर्व फसव्या असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे काही उड्डाणे वळवण्यात आली तर काही विमान कंपन्यांना सर्व प्रवाशांची पुन्हा तपासणी करावी लागली. या सगळ्या प्रकारामुळे विलंब झालाच शिवाय गैरसोय सुद्धा झाली.

एका वरिष्ठ अधिकार्‍याने पीटीआयला सांगितले की, एमएचएने नागरी विमान वाहतूक मंत्रालय, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), नागरी विमान वाहतूक ब्युरो, राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) यांना बॉम्बच्या धमक्यांबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.बॉम्बच्या धमक्यांच्या मालिकेनंतर एमओसीएचे वरिष्ठ अधिकारी गृह मंत्रालयाशी सतत संपर्कात राहिले आणि त्यांना परिस्थितीबाबत नियमित अपडेट्स देत होते. एमएचएच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी विमान वाहतूक क्षेत्रातील सर्व संबंधित सुरक्षा एजन्सींना या प्रकरणाचा अहवाल तयार करून लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. हे नुकसान करण्याचा कट होता का, हे शोधण्यासाठी केंद्रीय गुप्तचर संस्थेकडून तपासावर लक्ष ठेवले जाईल, असे ते म्हणाले. या धमक्या देणारी बहुतेक सोशल मीडिया खाती देशाबाहेरून कार्यरत असल्याचे आढळून आले आहे. सायबर सुरक्षा एजन्सी देखील सतर्क आहेत.

या अफवांमुळे विमानप्रवाशांमध्ये भितीचे वातावरण आहे. यातून विमान कंपन्यांचे होणारे नुकसान चिंता वाढविणारे आहे. पुढील काही महिन्यात काही राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणूका पार पडणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर या धमक्या सरकारला बदनाम करण्यासाठी तर नाही ना? किंवा कोणत्या कारणासाठी आहेत, याचा तपास वरीष्ट यंत्रणा करत आहेत. धमकीचा फोन आल्याबरोबर तो फोन कुठून आला आणि कुणी केला, किंवा सोशल मीडियावर सदर पोस्ट कुणी केली याबाबत त्वरीत माहिती देणारी यंत्रणा विकसित करणे गरजेचे आहे. त्यामुळे अशी खोटी माहिती देणार्‍यांना आवर घालता येईल. तसेच इतके बनावट कॉल येऊन सुद्धा विमान सेवेने घाबरून न जाता लगेच तपास करून विमानांची वाहतूक सुरळीत ठेवली, यासाठी त्यांचे कौतूक करायला हवे.

टिप्पणी पोस्ट करा

तुमच्या टिप्पण्या (comments ) आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत! कृपया आपले मत आणि प्रश्न येथे मांडा. आम्ही प्रत्येक टिप्पणी वाचतो आणि तुमच्या अभिप्रायाचे स्वागत करतो. आदरयुक्त आणि सकारात्मक सवांद राखण्यासाठी सर्व टिप्पण्या तपासूनच प्रकाशित होतात.

थोडे नवीन जरा जुने

{Ads}


इतके स्वस्त कपडे कधीच नव्हते, amazon वर आताच विकत घ्या

{Ads}

.
amazon वर एकदा चेक तर करा
सर्व आपल्या बजेटमध्येच आहे,
Watches- Men     Women
Footwear- Men      Women
.


.
amazon वर आज कोणत्या ऑफर्स
.