Vidarbha's Orange Crisis |
पूर्व महाराष्ट्रातील म्हणजेच विदर्भातील नागपूर शहर भारतातील 'ऑरेंज सिटी' म्हणून ओळखले जाते. विदर्भ हिरवळीच्या संत्र्यांच्या बागांसाठी आणि रसरशीत नागपूरच्या संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहे. तथापि, संत्रा पिकाला अनेकवेळा अभूतपूर्व आव्हानांचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे या प्रतिष्ठित उद्योगाचे अस्तित्व धोक्यात आले आहे, हा लेख विदर्भातील संत्रा शेतकऱ्यांच्या गंभीर समस्यांचा शोध घेतो आणि या महत्त्वपूर्ण क्षेत्राला पुनरुज्जीवित करण्यासाठी आवश्यक उपाय शोधतो.
संत्र्याच्या मृग बहाराचे संकट
जून महिन्यात अपेक्षित पाऊस न पडल्याने पूर्ण महाराष्ट्रात दूबार पेरणीच्या संकटावर खूप चर्चा झाली. विशेषत: नगदी पीक कापूस जे सद्या महाराष्ट्राचे सूपर पीक म्हणून गणले जात आहे त्या पीकाच्या आस्तित्त्वाबाबत आणि काही ठिकाणी चारा पिकांच्या उपलब्धेतबाबत प्रसारमाध्यमांनी मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देऊन चिंता व्यक्त केली. भरपूर पाऊस जरी म्हणता येत नसला तरी पीके तग धरू शकतील अशा पावसाने आता जवळजवळ सर्व ठिकाणी हजेरी लावली आहे. काही अपवाद वगळता दूबार पेरणीचे संकट टळले आहे. पण या सर्वबाबींमध्ये विदर्भातील संत्र्याच्या मृग बहाराचे एक महत्त्वपूर्ण संकट दुर्लक्षित राहिले.
सध्या राज्यात जवळपास २.६२ लाख हेक्टर क्षेत्रावर लिंबूवर्गीय फळपिकांची लागवड आहे. त्यातील १.५० लाख हेक्टर क्षेत्रात नागपूर संत्राची लगवड आहे. विदर्भात संत्रा उत्पादनासाठी अनुकूल जमीन व हवामान असल्यामुळे विदर्भात सुमारे सव्वालाख हेक्टरवर संत्रा लागवड होते. विदर्भातील निम्म्याहून जास्त संत्रा उत्पादन अमरावती जिल्ह्यात होते. त्यापाठोपाठ नागपूर जिल्ह्यात चांगल्या प्रमाणात संत्रा उत्पादन होेते. वर्धा, अकोला, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यातही काही ठिकाणी संत्र्याच्या बागा आढळतात. निसर्गत: आपल्या हवामानात संत्रा फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतात. त्यांपैकी पावसाळ्यात (जून-जुलै) येणार्या बहारास मृग बहार व पावसाळा संपल्यानंतर (ऑक्टोबरमध्ये) येणार्या बहारास हस्तबहार व थंडी संपतेवेळी (जानेवारी-फेब्रुवारी) म्हणजे आंब्यांना ज्या वेळेस बहार येतो तो आंबेबहार, असे तीन बहार वेगवेगळ्या हंगामात येतात.
विदर्भात एकूण क्षेत्रापैकी सुमारे ७० टक्के क्षेत्रावर मृग बहार घेतला जातो. बहार घेणे म्हणजे संत्र्याच्या झाडांना इच्छित महिन्यात फुलोरा येण्याच्या दृष्टीने फुलोरा येण्यापूर्वी काही दिवस तरी झाडांना विश्रांती देणे. अशा परिस्थितीत कृत्रिम उपायाने झाडाची वाढ थांबवावी लागते. वाढ थांबविण्याकरिता जमिनीच्या प्रकारानुसार काही दिवस तरी आलित बंद केले जाते. याला ताण देणे असे म्हणतात. भारी जमिनीस ४० ते ६० दिवसांचा व हलक्या जमिनीस ३० ते ५० दिवसांचा ताण पुरेसा असतो. विदर्भात मृग बहाराकरिता संत्रा बागांना २५ एप्रिलपासून १५ जूनपर्यंत पाण्याचा ताण दिला जातो. म्हणजेच बहार धरण्यापुर्वी एक ते दिड महिना किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी झाडांना पाणी देणे बंद केले जाते.जमीन भारी असल्यास जास्त दिवस पाण्याचा ताण दिला जातो. त्यामुळे झाडातला अन्नपुरवठा संचित होऊन त्यापासून फुल व फळधारणेला मोठा आधार मिळतो. उन्हाळ्यात आपल्याकडे पाण्याचे दुर्भिक्ष्य असते. अशा वेळी मृगबहार धरल्यास भर उन्हाळ्यात पाणी द्यावयाचे वाचते व ताण तोडण्यासाठी पावसाच्या पाण्याचा उपयोग होतो. तसेच मृगबहाराचा फुलोरा पावसाळ्यातील अनुकूल वातावरण, उष्णतामान आणि आर्द्रता यामुळे टिकून राहतो व फळधारणा उत्तम होत असल्यामुळे उत्पादन चांगले मिळते. फळे, गोड आणि उत्तम प्रतीची व रसरशीत असतात. भावदेखील चांगला मिळतो आणि या बहारावर फळमाशीचे नुकसान इतर बहारांच्या तुलनेने कमी आढळते. म्हणून जास्तीतजास्त शेतकरी मृगबहार घेण्याकडे कल दाखवितात.
मागील काही दशकात पावसाच्या वेळापत्रकात बराच बदल झालेला आहे. उशिरा पाऊस सुरू होणे, पाऊस वेळेवर सुरू झालातरी त्यानंतर लगेचच प्रदीर्घ कोरडा दुष्काळ किंवा सपूर्ंण हंगामात केवळ सात ते दहा दिवसांच्या काळातच भरपूर पाऊस पडणे, तुरळक पावसाने सूरूवात होऊन त्यानंतर ऑक्टोबर मध्ये पावसाने दमदार सुरूवात करणे प्रकार बर्याचवेळा दिसले. परंतु या हंगामात पावसाचा अंदाज सर्वच स्तरावर आणि सर्व ठिकाणी चुकला. मृग बहारासाठी ताणाच्या अवस्थेत असलेल्या संत्र्याच्या फळझाडांना जेव्हा जूनमध्ये पाऊस पडतो, तेव्हा त्यांचा ताण तुटतो. ताण तुटण्यासाठी झाडांना जूनचा शेवटचा आठवडा ते जुलेैचा पहिला आठवडा या कालावधीत १५० मि.मी.पाऊस लागतो. परंतु विदर्भात काही भाग वगळता इतर सर्व ठिकाणी पुरेसा पाऊस न पडल्याने मृग बहारासाठी संत्र्याच्या झाडांना एप्रिल-मे महिन्यात दिलेला पाण्याचा ताण पूर्णपणे तुटला नाही. तुरळक पावसाचे जे काही पाणी मिळाले तेवढ्या पाण्यात झाडांनी त्यांची शाकीय वाढ करून घेतली. परिणामी फक्त शाकीय वाढ झाल्यामुळे झाडांची पुनरूत्पादन क्षमता कमी झाली. त्यामुळे आता विदर्भातील मुख्य फळपीक असलेल्या संत्र्याचा ८० ते ९० टक्के बहर फुटलाच नाही. मृगबहार न आल्याने आता पुढील खर्चाची चिंता शेतकर्यांना पडली आहे. संत्रा उत्पादनात यामुळे मोठी घट होण्याची भीती असून नुकसानीचे आकडे शेकडो कोटीमध्ये व्यक्त केले जात आहेत. आता तर तेथील व्यापार्यांनी सौदे थांबविण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे व्यापार्यांशी करार करून निश्चित स्वरूपात शेतकर्यांना मिळणार्या रकमेची हमी यावर्षी अस्पष्ट झाली आहे.
ज्या शेतकर्यांकडे सिंचनाची पुरेशी व्यवस्था आहे, त्यांनी मृग बहारासाठी कृत्रिमरीत्या बागेला पाणी देऊन पाण्याचा ताण तोडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना देखील हवे तसे यश आले नाही. कारण शास्त्रीय दृष्ट्या पाण्याचा ताण तोडण्यासाठी अर्थातच भरपूर पाणी आवश्यक तर आहेच, त्यासोबत पावसामुळे बागेत निर्माण होणारी आणि बहर फुटण्यास मदत करणारी आर्द्रता देखील महत्त्वाची आहे. अशी आर्द्रता कृत्रिम सिंचनामुळे निर्माण करता येत नाही, त्यासाठी नैसर्गिक पाऊसच आवश्यक असतो. म्हणून सिंचनाच्या सोयी असल्यातरी किंवा नसल्यातरी मृग बहाराचे संकट सर्व विदर्भात आल्यासारखे आहे. तसेच नागपूर आणि अमरावती जिल्ह्यात दर्जेदार संत्रा पीक घेण्याची क्षमता असतांना हेक्टरी सरासरी १० टन उत्पन्न घेतले जात आहे. हे प्रमाण प्रगत देशांच्या तुलनेने निम्म्याहून कमी आहे.
तसेच येथे उत्पादित होणारी फळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हवा तसा निर्यातीचा दर्जा अजुनही गाठू शकली नाहीत. त्यासोबत सततचे अवर्षण, लहरी पाऊस, प्रमाणित कलमांचा अभाव, बागांचा र्हास, कीड व रोग प्रादुर्भाव, पोषणमूल्यांचा अपुरा वापर, बागेत वाटेल ती आंतरपिके घेणे, डिंक्या रोगाचे आक्रमण, भूजलाची खालावलेली पातळी ,भारनियमन, अनियमीत रासायनिक खतांची उपलब्धता अशा संकटांना तोड देता देता आता संत्रा बागायतदारांना मृग बहाराचे संकट फार मोठे वाटू लागले आहे. या संकटावर उपाय म्हणून लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र, कृषि विद्यापीठे आणि राज्य सरकारचा कृषि विभाग यावर काय संशोधन करतात आणि किती लवकर शिफारसी शेतकर्यांपर्यंत पोहोचवतात हे महत्त्वाचे आहे, या शिफारशी किंवा उपाय योजना शेतकर्यांपर्यंत वेळेत पोहोचल्या नाहीतर संत्रा उत्पादकांना नुकसानभरपाई देण्याखेरीज काहीही पर्याय उरणार नाही.
विदर्भातील संत्रा शेतकरी पर्यावरणीय, आर्थिक आणि सामाजिक आव्हानांच्या परिपूर्ण वादळातून मार्गक्रमण करत आहे. या प्रदेशातील संत्रा उद्योगाला पुनरुज्जीवित करण्यासाठी, हवामान बदलावर लक्ष केंद्रित करणे, सिंचन पायाभूत सुविधा सुधारणे, रोग आणि कीड व्यवस्थापन वाढवणे, यावर त्वरित लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. या आव्हानांवर मात करण्यासाठी, सरकारी उपक्रम, वैज्ञानिक संशोधन आणि सामुदायिक सहभागासह एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. धोरणकर्ते, कृषी तज्ज्ञ आणि शेतकरी यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ही आव्हाने कमी होऊ शकतात आणि भारताचा प्रमुख संत्रा उत्पादक प्रदेश म्हणून विदर्भाची प्रतिष्ठा पुनर्संचयित होऊ शकते.