Get together of Krushi Tantra Vidyalay, Nakane |
धुळे- कृषी तंत्र विद्यालय, नकाणे, ता.जि.धुळे या विद्यालयात २००५ ते २००७ या वर्षात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा दि.५-११-२०२४ रोजी साई-लक्ष्मी लॉन्स, गोंदूर येथे यशस्वीपणे आयोजित करण्यात आला.
कृषी तंत्र विद्यालय, नकाणे, ता.जि.धुळे येथे महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत २००४ ते २०१४ या वर्षी सुरू असलेल्या कृषि तंत्र पदविका या दोन वर्षाच्या पदविका अभ्यासक्रमात शेकडो विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. विद्यालयाच्या या १० वर्षांत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी २००५ ते २००७ या बॅचच्या विद्यार्थ्यांनी १७ वर्षांनंतर पुन्हा विद्यालयाच्या त्या रम्य आठवणीत एक दिवसासाठी का होईना, जगायचे ठरविले. सतरा वर्षांनी पुन्हा सर्वांशी संपर्क साधून एकत्र येणे सोपे नव्हते. कारण १७ वर्षांपूर्वी मोबाईलचे नुकतेच आगमन झाले होते. कॅमेरा असलेले मोबाईलही तेव्हा दूर्मीळ होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी फेसबूक, आताचे व्हॉटस्अप ग्रूप आणि माजी शिक्षक यांच्याशी संपर्क साधून अनेक माजी विद्यार्थ्यांची माहिती मिळविली. त्या सर्वांना एका नवीन व्हॉटस्अप ग्रुपमध्ये एकत्र आणले. सर्व विद्यार्थी सद्या काय करतात आणि कुठे रहातात, याची माहिती घेऊन दि.५-११-२०२४ रोजी २००५ ते २००७ या वर्षी शिक्षण घेतलेल्या मुलांनी गेट टुगेदर आयोजित करण्याचे ठरविले आणि त्या कार्यक्रमाला नाव देण्यात आले- माजी विद्यार्थ्यांचा १७ वर्षांनंतर स्नेह मेळावा.
साईलक्ष्मी लॉन्स, निमडाळे रस्ता, नवनाथ मंदिराजवळ, गोंदूर, ता.जि.धुळे येथे या स्नेह मेळाव्याची सुरूवात विद्यालयाचे मा. प्राचार्य योगेश भोलाणे आणि प्राध्यापक मनोज माळी यांच्या स्वागत समारंभाने झाली. सतरा वर्षांनी पदिल्यांदा एकत्र आलेल्या मुलांनी नंतर स्वत:चा परिचय करून दिला. या मुलांपैकी काहीजण शेती व्यवसाय करत आहेत तर काहीजण शेतीशी निगडीत सरकारी आणि खाजगी संस्थेत कार्यरत आहेत. काही मुलांनी राजकारण त्यांचे भाग्य उजळलेले असून ते सरपंच पदावर कार्यरत आहेत तर काही जण अकृषि क्षेत्रात कार्यरत आहेत. एक बाब मात्र निश्चित की प्रत्येक जण काही ना काही धडपड करून सन्मानाने आयुष्य जगत आहे. काही मुलांनी यशाचे उत्तुंग शिखर गाठलेले असून काही जणांनी बर्यापैकी आर्थिक प्रगती केलेली दिसली. या कार्यक्रमाला मुलींची उपस्थिती देखील दखल घेण्याजोगी होती.
या कार्यक्रमात उपस्थिती प्रत्येक विद्यार्थ्याचा माजी शिक्षकांनी पुष्प देऊन सत्कार केला. नंतर विद्यालयाचे माजी प्राध्यापक आणि सद्या प्रभारी अधिकारी, हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, ता.मिरज, जि.सांगली तसेच अतिरिक्त पदभार प्राचार्य, कृषी तंत्र विद्यालय,कसबे डिग्रज येथे कार्यरत असलेले डॉ. मनोज माळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सद्यस्थितीत सरकारी आणि खाजगी नोकरीच्या संधी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीने विकसित केलेल्या नवीन जाती आणि संशोधन या विषयी मुलांना माहिती दिली. नंतर विद्यालयाचे मा. प्राचार्य योगेश भोलाणे यांनी २००५ ते २००७ या वर्षात घडलेल्या काही घटनांचा उल्लेख करून जुन्या आठवणी प्रकाश झोतात आणल्या. सर्व विद्यार्थ्यांचे आजचे सरासरी वय ३५ ते ४० वर्ष लक्षात घेता त्यांना क ची मालिका समजावून सांगितली. या क च्या मालिकेत कनक, कामिनी, कलह, कम्प्युटर, करामत, कर्ज, कुटुंब, कवायत, कंजुसी आणि कर्तव्य हे घटक येतात आणि याचा पुढील आयुष्यात कसा अर्थ लागतो हे सुद्धा स्पष्ट केले. सर्व मुले एक उत्तम नागरिक म्हणून आयुष्य जगतांना त्यांचे कर्तव्येही यशस्वीपणे पार पाडत आहेत, याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. मैत्रीचा स्नेह अनोखा आणि मधुर आहे, त्याची चव चाखा. क्रोध, ईर्ष्या आणि दुसर्यांशी तुलना घातक आहे, त्याला बाजूला ठेवा. संकटे ही क्षणभंगुर असतात, त्यांचा सामना करा. मावळतांना क्षितीजाखाली गेलेला सूर्य परत दिसू शकतो, पण विद्यालयातले जिवलग मित्र परत कधीच निर्माण करता येत नाही, म्हणून मित्र जपा आणि मैत्री जपा. तसेच जमेल तसं आणि जमतील तेवढे मात्र गेट टूगेदर करीत रहा, असा मोलाचा सल्ला भोलाणे सरांनी दिला. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी सद्यस्थितीत यशाचा, पदाचा आणि आर्थिक पातळीचा एक उंच टप्पा गाठलेला आहे, त्यांनी इतर मुलांनाही पुढे कसे आणायचे, त्यांना प्रेरित कसे करायचे यावरही भोलाणेसरांनी जोर दिला.
कार्यक्रम सुरू असतांना प्रत्येक क्षण आपापल्या मोबाईलच्या कॅमेरात बंद करण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू होती. आभार प्रदर्शन, सूत्र संचालन, स्वागत समारंभ, फोटोग्राफी, साउण्ड सिस्टीम इत्यादी आयोजनात विलास बुवा, योगेंद्र गिरासे आणि इतर विद्यार्थ्यांची धावपळ उल्लेखनीय होती.
नंतर सुरूची भोजनाचा आस्वाद सर्वांनी घेतला. विचारांची देवाण-घेवाण, जुन्या स्मृतींना उजाळा, माजी शिक्षकांचे मार्गदर्शन अशा प्रकारे हा स्नेह मेळावा उत्तम प्रकारे पार पडला. विद्यालयाचे माजी शिक्षक डॉ.पी.ए. देवरे, विद्या पाटील मॅडम, दुसाने सर, लिपीक संजय पिंगळे त्यांच्या व्यस्त कार्यामुळे येऊ शकले नाहीत. मात्र त्यांनी फोन द्वारे सर्व मुलांना शुभेच्छा दिल्या.
कृषी तंत्र विद्यालय, नकाणेचा हा स्नेह मेळावा यशस्वी होण्यासाठी विलास बुवा, नितीन पाटील, निलेश पाटील, केतन अहिरे, हिरालाल शिंदे, गणेश पाटील, सुशिल पाटील, अनिल चव्हाण, विशाल अकलाडे, रोहिणी कापे, अनिता पाटील, राजश्री पाटील, ज्ञानेश्वर पाटील, पुनम जाधव, कल्याणी वाघ, मनोज सावंत, दशरथ गावीत, गणेश देसले, नैनेश गावीत, सुशिल पाटील, कपिल पाटील, योगेंद्र गिरासे आणि चेतन पाटील यांनी मेहनत घेतली. असा मेळावा दरवर्षी आयोजित करण्याचे ठरले आणि पुढील वर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा दिवाळी संपल्यावर लगेच हा मेळावा आयोजित करायचा, असे नियोजन करून सर्व मुलांनी एकमेकांचा निरोप घेतला.
-----------------------------------
कृषी तंत्र विद्यालय, नकाणेच्या विद्यार्थ्यांनी खालील लिंकद्वारे आपल्या Krushi Tantra Vidyalay, Nakane (Off.) या माजी विद्यार्थ्यांच्या अधिकृत व्हॉटस्अप गृपमध्ये सामील व्हावे.
https://chat.whatsapp.com/IV9uQGi8hxUH9segQCgWCk
या गृपचा उद्देश माजी विद्यार्थ्यांना पुन्हा कनेक्ट करणे, प्रेरणा देणे, त्यांना पाठिंबा देणे, महत्त्वाच्या बातम्या, इंटर्नशिप, नोकरीच्या संधी, यशस्वी विद्यार्थ्यांनी त्यांच्या यशोगाथा शेअर करणे आणि इतर विद्यार्थ्यांना प्रेरित करणे, अनुभवी व्यावसायिकांकडून मार्गदर्शन मिळविणे असा आहे.
-----------------------------------
Get Together |