विरोधी पक्षाची भूमिका स्विकारा
अठराव्या लोकसभेचा निकाल जाहीर झाला, तेव्हाची परिस्थिती वाचकांना चांगलीच आठवत असेल. सरकार स्थापनेसाठी २७२ या मॅजिक फिगरची गरज असते, हे तर आता प्रतयेक भारतीयाला माहीत पडले आहे. तेव्हा भाजपाप्रणीत एनडीएला सध्या २९२ जागा मिळाल्या. त्यात एकट्या भाजपाला २४० जागा मिळाल्या आहेत, तर २७ पक्षांनी एकत्र मोट बांधलेल्या विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला २३४ जागांवर समाधान मानावे लागले. वरील आकडे अभ्यासता बहुमताचा आकडा राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) स्पष्टपणे मिळाला आणि राष्ट्रपती भवनाकडून नरेंद्र मोदी यांना तिसर्यांदा सत्ता स्थापनेचे आमंत्रण मिळाले.
खरेतर वरील आकडेवारी आणि सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या जागांची गरज लक्षात घेता नैसर्गिक न्याय तत्त्वाने देशातील जनतेने भाजपाप्रणीत एनडीएला स्पष्ट बहुमत दिले होते. तरीही इंडिया आघाडीच्या काही नेत्यांनी थेट किंवा अप्रत्यक्षपणे सरकार स्थापनेसाठी प्रयत्न केले, हे कुणीही विसरलेले नाही. देशातील दीडशे वर्षांचा इतिहास सांगणार्या कॉंग्रेसला या निवडणुकीत शंभर जागांचा आकडा पार करता आला नाही. याच कॉंग्रेसच्या हाताचा पंजा पुढे करून,देशभरांतील विविध राज्यांतील मोदी विरोधी लोकांनी सत्ता स्थापनेसाठी एकमेकांना साथ दिली. तिला इंडिया आघाडी असे नाव दिले. परंतु या आघाडीने २०२४ च्या निवडणुकीत २७२ चा बहुमताचा आकडा गाठला नाही, आपले सरकार आता स्थापन होऊ शकत नाही, हे दिसल्यावर इंडिया आघाडीतील काही नेत्यांनी एनडीएतील घटक पक्ष कधी फुटतील आणि आपण कधी सत्तास्थापन करू, या आशेवर सत्ता स्थापनेचे काही आरखडीही बांधले. एनडीएतील मित्रपक्ष चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देसम आणि नितीश कुमार यांचा जनता दल (युनायटेड) हे दोघे पक्ष फुटतील आणि आपण सत्तेचा दावा करू, अशी गणिते इंडिया आघाडीतील काही घटक पक्षांनी मांडली. त्याचे कारण आंध्र प्रदेशात तेलुगू देसम पक्षाचे १६ खासदार आणि बिहारमध्ये जनता दल युनायटेडचे १२ खासदार निवडून आले आहेत. दोघे जण इंडिया आघाडीत आले, तर २८ खासदारांचा मोठा पाठिंबा मिळवून सत्तेच्या जवळ जाता येईल, याची स्वप्ने इंडिया आघाडीतील काही नेत्यांना पडली. खासगीमध्ये या नेत्यांनी चंद्राबाबू आणि नितीशकुमार यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला; परंतु हे दोघेही नेते बधले नाहीत. दिल्लीतील बैठकीत नरेंद्र मोदी यांना पाठिंब्याचे सहमती पत्र टीडीपी नेते एन. चंद्राबाबू नायडू, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिल्यानंतर इंडिया आघाडीतील नेत्यांचा भ्रमनिरास झाला.
अब की बार चारसो पार-
भाजपाचा वरील डायलॉग सर्वार्ंना चांगला आठवत असेलच. या निवडणूकीत चारशे जागा निवडूनच आणायच्या या उद्देशानाचे आम्ही ही निवडणूक लढत आहोत आणि आम्ही चारशे पेक्षा जास्त जागा जिंकूच असा प्रचार भाजपाच्या प्रमुख नेत्यांनी निवडणूकीच्या अगोदर केला. अब की बार चारसो पार या भाजपाच्या डायलॉगने तर इंडीया आघाडीची चांगली झोप उडविली होती. त्यामुळे इंडीया आघाडीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी, भाजपला कोणत्याही परिस्थितित चारशे जागा मिळू द्यायच्या नाहीत, यासाठी खूप मेहनत घेतली आणि झालेही तसेच. भाजप आणि मित्र पक्षांना २९२ जागांवरच समाधान मानावे लागले. तेवहा इंडीया आघाडीच्या अनेक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना जणू ही निवडणूक जिंकल्यासारखा आनंद झाला. पण ते हे विसरले की भाजप आघाडीला जरी चारशे जागा मिळाल्या नाही तरी सरकार स्थापनेसाठीचे पुरेसे बहुमत मिळालेले आहे. खरे तर इंडीया आघाडीची लढाई ही भाजप आघाडीला सरकार स्थापन करू न देण्यासाठीची होण्याऐवजी भाजप आघाडीला चारशे जागा मिळू द्यायच्या नाही, अशी झाली. भले आपले सरकार स्थापन झाले नाही याचे दु:ख करण्याऐवजी भाजपाला चारशे जागा मिळाल्या नाहीत, याचा अधिक आनंद अजुनही अनेक इंडिया आघाडीच्या नेत्यांना होतांना दिसतो.
खरं तर लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला तेव्हा एनडीएला सगळ्यांत जास्त जागा मिळाल्या आहेत, ही बाब स्पष्ट झाली होती. त्यामुळे भाजपाप्रणीत एनडीए आघाडी सत्तेवर येणार हे सर्वश्रूत असतानासुद्धा विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या काही विधानांमुळे इंडिया आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न झाला. पण, बहुमताचा जादुई आकडा कुठून आणणार हे सत्य माहीत असतानाही, जनतेमध्ये भ्रम निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यासोबत इंडीया आघाडीच्या अनेक मुख्य नेत्यांनी वेगवेगळे अभिप्राय देऊन जनतेला चांगलेच गोंधळात टाकण्याचा प्रयत्न केला.
राहुल गांधी यांनी पदयात्रा काढून देशातील वातावरण बदलून टाकले व जनतेत मोठा आत्मविेशास निर्माण केला. देशाची लोकशाही व संविधान वाचवण्याच्या लढाईत तानाशाही सरकार विरोधात ते खंबीरपणे लढले व जनताही त्यांच्या पाठीशी उभी राहिली, राहुल गांधी यांच्या गॅरंटीवर जनतेने विेशास ठेवला. कार्यकर्त्यांची मेहनत व मजबूत संघटन, मल्लिकार्जून खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या मार्गदर्शनामुळे कॉंग्रेस पक्षाने मोठा विजय संपादीत केला आहे. म्हणून बहूमत इंडीया आघाडीला मिळालेले आहे आणि मोदी सरकार तानाशाही पद्धतीने सरकार स्थापन करीत आहे असे दाखविण्याचाही अप्रत्यक्ष प्रयत्न विविध सोशल मीडियाद्वारे करण्यात आला. तसेच सत्तेत जाण्यासाठी सर्व उत्सुक असले तरी, दोन डझनपेक्षा जास्त पक्ष एकत्र असतानाही साधा बहुमताचा आकडा पार करता आला नाही. त्यामुळे मोदी सरकारला जनतेच्या समोर तानाशाही कारभारावरून खलनायक ठरविण्याचा प्रयत्न विरोधकांचा फसला, हे इंडीया आघाडीने अजुनही मान्य केलेले नाही. पश्चिम बंगालमध्ये कॉंग्रेस आणि तृणमूल कॉंग्रेस, पंजाबमध्ये कॉंग्रेस आणि आप, केरळमध्ये कॉंग्रेस आणि कम्युनिस्ट हे एकमेकांच्या विरोधात लढले. तरीही आम्ही इंडिया आघाडीचा भाग असल्याचा प्रयत्न या पक्षांनी केला, असा प्रकार जनतेला पटला नाही, हेही निकालावरून दिसून आले.
एनडीए पक्षातील कोणी आपल्या बाजूने आले तर त्यांचे स्वागत करू, अशी अपिल इंडीया आघाडीच्या नेत्यांनी वारंवार केली, विशेष म्हणजे संविधानाचा मुद्दाही पुन्हा उपस्थित केला. जे पक्ष संविधान वाचविण्यासाठी एकत्र येतील त्यांना सन्मानाने आमच्या सोबत घेऊ, अशी भावनिक सादही देण्यात आली. भाजपाप्रणीत एनडीए सरकार केंद्रात सत्तेत आले तर संविधानाला धोका निर्माण होईल, अशी भीती जनतेच्या मनात घालण्याचा प्रयत्नही करण्यात आला. बरे या भूतकाळातील बाबी असून आता आठवण करून देत आहोत असेही म्हणता येत नाही. कारण असे प्रयत्न अजुनही सुरू असतांना दिसतात. खरे तर इंडीया आघाडीने आता एक विरोधी पक्ष म्हणून स्वत:ला ओळखले पाहिजे, स्वत:ची भूमिका अभ्यासली पाहिजे. परंतु असे न होता, आता किंवा भविष्यात एनडीएतील काही नेते बंड करतील आणि आपल्या सोबत आल्यावर आपण सरकार स्थापन करू अशी स्वप्ने पाहत राहणे एवढंच काम आता इंडिया आघाडीचे करतांना दिसत आहेत.