निसर्ग धोक्यात-भारतातील पर्यावरणीय आव्हाने आणि उपाय

Environmental Challenges and Solutions in India
Ecological Balance in India: A Call for Action

आपला देश वैविध्यपूर्ण परिसंस्था आणि समृद्ध जैवविविधतायुक्त असला तरी जलद औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि लोकसंख्या वाढीमुळे पर्यावरणीय संतुलनाकडे नीट लक्ष देण्यात कमी पडत आहे. हवा आणि जल प्रदूषण, जंगलतोड, मातीचा र्‍हास आणि हवामान बदलामुळे निर्माण होणार्‍या आपत्तींसारख्या गंभीर आव्हानांना तोंड देण्यासाठी आपण खरोखरच तयार आहोत का, याकडे गाभीर्याने बघण्याची वेळ आली आहे. पर्यावरणाचे असंतुलन केवळ निसर्गाचेच नुकसान करीत नसून १४५ करोड लोकांच्या आरोग्याला आणि उपजीविकेलाही धोका निर्माण करते. या पर्यावरणीय असंतुलनाची कारणे शाश्वत विकास पद्धती, अपुरी धोरण अंमलबजावणी आणि जनजागृतीचा अभाव यामध्ये खोलवर रुजलेली आहेत. तथापि, नाविन्यपूर्ण हरित तंत्रज्ञान, मजबूत सरकारी कृती आणि सामूहिक सामाजिक प्रयत्नांद्वारे, भारत शाश्वत भविष्याकडे वाटचाल करू शकतो. हा लेख भारताच्या पर्यावरणीय संकटामागील प्रमुख कारणे शोधतो आणि निसर्ग आणि प्रगती यांच्यातील सुसंवाद पुनर्संचयित करण्यासाठी कृतीयोग्य उपाय देतो.

पर्यावरण संतुलनासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक

पर्यावरण हा शब्द फारच थोडक्यात विचारात घेऊन नका. पर्यावरण मध्ये हवामानाबरोबरच निसर्गामध्ये आढळणारे मनुष्यासहित सर्व प्राणी, पशू पक्षी, नद्या, जंगल, डोंगरदर्‍या यांचा समावेश होतो. यातील एखाद्या घटकाचे प्रमाण कमी- जास्त झाल्यास पर्यावरणाचा तोल बिघडतो. असा पर्यावरणाचा तोल बिघडविण्यासाठी कोण जबाबदार आहे? प्राणी, पक्षी, जंगल, पर्वत, नद्या आणि समूद्र, यापैकी कुणीही जबादार नसून केवळ आपण म्हणजेच मनुष्यच जबाबदार आहे. बुद्धीच्या जोरावर मनुष्य प्राणी संपूर्ण पृथ्वीवर वर्चस्व दाकवित आहे. मात्र या बुद्धीची ताकद मनुष्य पर्यावर संतुलनासाठी न करता निसर्गाच्या नियमात ढवळाढवळ करण्यासाठी करीत आहे. मनुष्याच्या या कृत्यामुळे पुढील काही वर्षात पृथ्वीवरील जीवसृष्टीच धोक्यात येण्याची संभावना दिसू लागली आहे. मात्र याची चाहूल लागूनही मनुष्याने पर्यावर वाचविण्यासाठी कोणतिही ठोस अशी कृती केलेली दिसत नाही. खरे तर पर्यावरणाचे संतुलन राखणे हे केवळ सरकारचे काम नाही, आपल्या सर्वांचे आहे. आपण आपल्या जीवनात, दैनंदिन व्यवहारात थोडफार बदल करून पर्यावरण संतुलन राखण्यात मदत करू शकतो. 

पर्यावरणाचे संतुलन बिघडविणार्‍या बाबी-

लोकसंख्या वाढ, वाढते शहरीकरण, मानवी रहिवासासाठी होत असलेली जंगलतोड, पायाभूत सुविधांसाठी होणारे बांधकाम, कारखान्यांचा आणि गाड्यांचा धूर, कारखान्यातील नदी-समुद्रात जाणारे दूषित पाणी, कचर्‍याची मोठ्या प्रमाणावर होणारी निर्मिती, मोठ्या प्रमाणावर होणारा प्लास्टिकचा वापर यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. हे बिघडणारे संतुलन वाचविण्यासाठी सरकारी पातळीवर आता यावर बर्‍याच उपाययोजना सुरू झाल्या आहेत. उदा. 

  • विजेवर चालणारी वाहने - जी पेट्रोल, डिझेलमुळे होणारे प्रदूषण वाचवतात, 
  • रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी आणि सोसायट्यांमधून कचर्‍यापासून खत निर्माण करणारी यंत्रणा बसवण्यासाठी प्रोत्साहन, 
  • मोठ्या सरकारी कार्यालयात सौर ऊर्जेचा वापर, 
  • हाऊसिंग सोसायट्यांतून सोलर पॅनल्स बसवून वीज निर्मिती केल्यास विजेच्या येणार्‍या बिलात सूट वगैरे, 
  • कचर्‍यापासून बायोगॅसची निर्मिती, 
  • प्लास्टीक पिशव्यांवर लादलेली बंदी, 
  • कचरा संकलनासाठी सरकारी पातळीवर व्यवस्था, 
  • नदी-नाले स्वच्छता मोहीम, 
  • पर्यावरण संतुलनासाठी शालेय पुस्तकांमध्ये उपयुक्त लेख, 
  • कारखान्यांमधून वाया जाणारे घटक नदी नाल्यांमध्ये मिसळण्यावर बंदी आणि कठोर कायदे. 

जी २० परिषदेत पर्यावरणावर संतुलनावर नागरिकांची भूमिका स्पष्ट 

जी २० परिषद२०२३ मध्ये भारतामध्ये झालेल्या जी २० परिषदेमध्ये जागतिक पर्यावरण बदल यावर विचार झाला. या परिषदेच्या मिशन लाईफ अंतर्गत पर्यावरणीय र्‍हास थांबवण्यासाठी एक जबाबदार नागरिक म्हणून आपण व्यक्तिगत पातळीवर रोजच्या व्यवहारात काय करू शकतो याची ७ विभागांत एकूण ७५ उदाहरणे स्पष्ट केली आहेत. एक नागरिक म्हणून त्या त्या देशातील प्रत्येक माणसाला  शुद्ध पर्यावरणाचा हक्क आहे. पण केवळ हक्क सांगून चालणार नाही, तर हक्कासोबत आपण आपली कर्तव्येही विचारात घेतली पाहिजेत. आपलं कर्तव्य ५ जून या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने एक सुजाण आणि सजग ग्राहक म्हणून आपण पर्यावरणाचा स्तर पर्यावरणाचा स्तर सुधारण्यासाठी आपण आपली जबाबदारी खालील प्रकारे पार पाडू शकतो. 

कचरा संकलन आणि विनियोग-

आपल्या घरापासून आपण सुरुवात केल्यास प्रथम आपण घरातला कचरा ओला आणि सुका असा वेगळा करूनच घंटागादीत द्यायला हवा. ओला कचरा म्हणजेच स्वयंपाक घरात / किचनमध्ये निर्माण होणारा कचरा. यात, भाज्यांचे देठ, साल, उरलेले अन्न, निर्माल्य वगैरेंचा समावेश होतो. या कचर्‍याचे घरच्या घरी आपण खत बनवू शकतो. म्हणजेच तो डम्पिंग ग्राउंडवर जाणार नाही याची काळजी आपणच घ्यायची आहे. दुसरं म्हणजे सुका कचरा - यात, प्लास्टिक पिशव्या, दुधाच्या पिशव्या, कागदी पिशव्या, खोके, पुठ्ठे, खाद्य पदार्थांची वेष्टने, टेट्रा पॅक, प्लास्टिकचे डबे, शीतपेयांच्या आणि पाण्याच्या बाटल्या यासारख्या वस्तू येतात. बर्‍याच पर्यावरण प्रेमी संस्था सुका कचरा गोळा करून या संस्था तो योग्य रीतीने रिसायकल करण्याचे काम करत आहेत. महापालिकासुद्धा आता सुका कचरा गोळा करण्यासाठी वेगळे ड्रम्स सोसायट्यांना देते आणि त्यात जमा झालेला कचरा गोळा करून पुढील कार्यवाहीसाठी घेऊन जाते. बाजारात आपण सामान आणण्यासाठी जातो तेव्हा प्रत्येक वस्तूबरोबर सिंगल युज प्लास्टिकची एक पिशवी बरोबर आणण्या ऐवजी एखाद-दोन कापडी पिशव्या घेऊन गेल्यास तितका कचरा आपण कमी करू शकतो. हल्ली घरगुती समारंभामध्ये पाण्याच्या छोट्या छोट्या बाटल्या दिल्या जातात. यात उरलेले पाणी फुकट जाते. आपण आपल्या घरच्या समारंभात पाण्याचा तांब्या, भांडे ठेवल्यास आपल्याला हवे तितकेच पाणी प्रत्येक जण घेईल. यामुळे पाण्याचीही बचत होईल आणि प्लास्टिकचा वापरही कमी होईल. याचबरोबर खाद्यपदार्थ देताना कागदी किंवा प्लास्टिकच्या डिशेस आणि चमचे न वापरता स्टील किंवा काचेच्या डिशेस आणि चमचे वापरल्यास तितके प्लास्टिक कचर्‍यात जाण्यापासून आपण वाचवू शकतो. तसेच चहा/ कॉफीसाठी किंवा शीतपेयांसाठी कागदी, प्लास्टिक किंवा थर्मोकोलचे पेले न वापरता स्टीलची फुलपात्र किंवा काचेचे पेले वापरल्यास आपण सुक्या कचर्‍याची निर्मिती काही प्रमाणात कमी करू शकतो.

ई-वेस्ट/ इलेक्ट्रॉनिक कचरा

ई-वेस्ट मध्ये जुने मोबाइल्स, लॅप टॉप्स, पेनड्राइव्हस, संगणाकाचे खराब झालेले भाग जसे की मॉनीटर, की-बोर्ड, माऊस इ., विजेची बंद पडलेली उपकरणे, विजेचे बल्ब्स, वायर यांसारख्या वस्तूंचा समावेश होतो. असे ई-वेस्ट प्रक्रिया करणार्‍या सबंधित संस्थांना दिल्यास त्यांची योग्य रीतीने विल्हेवाट लावली जाऊ शकते. तसेच जी जी उपकरणे आपण दुरुस्त करून वापरू शकतो ती दुरुस्त करून घ्यावीत. पेन ड्राईव्ह किंवा हार्ड डिस्क ड्राईव्ह ऐवजी क्लाऊड स्टोरेजचा वापर करावा. साध्या बॅटरीसेल्स ऐवजी रिचार्जेबल लिथियम सेल्सचा वापर आपण सहज करू शकतो. आपण पाहिले असेल की फ्रीज, एसी अशा दैनंदिन वापरण्यात येणार्‍या इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांवर १ ते ५ असे स्टार रेटिंग दिलेले असते. जितकी विजेची बचत जास्त तितके स्टार जास्त. शक्यतो अशी उपकरणे ५ स्टार रेटिंग असलेली विकत घ्यावी. 

पर्यावरण दुरूस्ती-

कचर्‍याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावल्यास पर्यावरण बिघडविण्यापासून आपण काही अंशी हातभार निश्‍चित लावू शकतो. पण त्यासोबत पर्यावरण दुरूस्तीसाठीही प्रयत्न करायला हवेत. काही संस्था किंवा काही पर्यावरण प्रेमी नागरिक देशी झाडांच्या बियांपासून रोपे तयार करून ती रस्त्यांच्या कडेला, महामार्गावर, ओसाड ठिकाणी नेऊन रुजवतात आणि त्यांची काळजी घेतात. हे कार्य कौतुकास्पद असले तरी फार थोड्या प्रमाणावर सुरू आहे. त्याचबरोबर काही पर्यावरण प्रेमी लोक हे दुकानदार, भाजी विक्रेते, फुलवाले आणि ग्राहक यांना सिंगल युज प्लास्टिकचे दुष्परिणाम पटवून देऊन रोजच्या वापरासाठी कापडी पिशव्या वापरण्यास उद्युक्त करून जनजागृती करत आहेत. वरील उपाय पर्यावरण मजबुतीसाठी फारच आवश्यक असले तरी फारच थोड्या प्रमाणावर सलरू आहेत. हे उपाय मोठ्या प्रमावर झाल्यास निश्‍चितच पर्यावरणाचे संतुलन राखण्यात ठोस असे परिणाम बघता येतील. 

निष्कर्ष

भारतात, जलद औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि जंगलतोड यामुळे हे संतुलन लक्षणीयरीत्या बिघडले आहे, ज्यामुळे हवामान बदल, जैवविविधतेचे नुकसान आणि प्रदूषण होत आहे. तथापि, शाश्वत पद्धती स्वीकारून, पर्यावरणीय शिक्षणाला प्रोत्साहन देऊन, कठोर कायदे लागू करून आणि समुदायाच्या सहभागाला प्रोत्साहन देऊन, आपण पर्यावरणीय सुसंवाद पुनर्संचयित आणि जतन करू शकतो. येणार्‍या पिढ्यांसाठी हिरवेगार, निरोगी आणि अधिक शाश्वत भविष्य सुनिश्चित करण्यासाठी सरकारी संस्था, उद्योग आणि नागरिकांचे सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

तुमच्या टिप्पण्या (comments ) आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत! कृपया आपले मत आणि प्रश्न येथे मांडा. आम्ही प्रत्येक टिप्पणी वाचतो आणि तुमच्या अभिप्रायाचे स्वागत करतो. आदरयुक्त आणि सकारात्मक सवांद राखण्यासाठी सर्व टिप्पण्या तपासूनच प्रकाशित होतात.

थोडे नवीन जरा जुने